|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती जोशींना उमेदवारी

वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती जोशींना उमेदवारी 

सिंधुदूर्ग-रत्नागिरीत आंबेडकरांचे ‘कुणबी कार्ड’

प्रतिनिधी/ देवरुख

काँग्रेस आघाडीबरोबरची चर्चा फिसकटल्यानंतर वंचित बहुजन विकास आघाडीने राज्यातील 37 जागांवरील उमेदवार जाहीर गुरूवारी जाहीर केले. यामध्ये सिंधुदूर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदार संघामधून साखरपा येथील समाजसुधारक मारुती उर्फ काका जोशी यांची तर रायगड मतदारसंघात सुमन काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 

 काका जोशी हे कुणबी समाजाचे असून मुंबई पोलिस दलातून सहाय्यक उपनिरीक्षक पदावरुन निवृत्त झाले. निवृत्तीनंतर 1997 साली स्थापन झालेल्या बहुजन विकास आघाडीचे काम यांनी सुरू केले.  2002 मध्ये विश्वनाथ पाटील यांनी कुणबी सेनेची स्थापना केली. यामध्ये काका जोशी यांचा पुढाकार होता. माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसेपाटील यांचे ते खंदे समर्थक मानले जातात. 

गेली अनेक वर्षे बहुजन समाजातील अनिष्ट प्रथा बंद पाडण्यासाठी ते कार्यरत आहेत. यासाठी ‘बहुजनांचे कृतीतून परीवर्तन’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. बहुजन चळवळीत नावाजलेला चेहरा रिंगणात उतरवून डॉ. आंबेडकर यांनी मोठी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.