|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आयुर्वेद महाविद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

आयुर्वेद महाविद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित 

प्रतिनिधी/ पणजी

 ऑर्ब एनर्जीने गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्रामध्ये 30 किलोवॅटच्या रुफटॉप सोलर सिस्टीमची यशस्वीपणे उभारणी करुन ती कार्यान्वित केली आहे. ऑर्बची ही रुफटॉप सोलर सिस्टीम प्रति वर्ष सुमारे 50 हजार एकक स्वच्छ वीजनिर्मिती करेल, ज्यामुळे संस्थेला विजेवरील खर्चामध्ये मोठय़ा प्रमाणात बचत करण्यास साहाय्य होणार असल्याची माहिती ऑर्ब एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅमियन मिलर यांनी दिली.

यावेळी पत्रकार परिषदेत गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे अध्यक्ष पी. के. घाटे, महाविद्यालयाचे सचिव बखले आणि महाविद्यालयाचे सरचिटणीस अभय प्रभू यांची उपस्थिती होती. गोवा शासनाचे नेट मिटरिंग धोरण कार्यान्वित झाल्यापासून ही पहिलीच रुफटॉप सोलर सिस्टीम आहे. गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्राने आपल्या 30 किलोवॅट रुफटॉप सोलार सिस्टीमची संरचना, पुरवठा आणि उभारणी करण्यासाठी ऑर्बची निवड केली याचा आम्हाला अत्यानंद होत असल्याचे प्रतिपादन डॅमियन मिलर यांनी केले.

अध्यक्ष पी. के. घाटे यांनी महाविद्यालयाबद्दल सांगितले की, शिक्षण आणि आरोग्य यातील गुंतवणुकीमुळे भारताचे परिवर्तन एका विकसीत राष्ट्रामध्ये होऊ शकेल या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. सर्वोत्तम अशा अध्यापन आणि वैद्यकीय अनुभवांद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदातील अद्वितीय शैक्षणिक अनुभव देण्यास गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय आणि संशोधन केंद्र कटिबद्ध आहे. संस्थेच्या या उद्देशपूर्तीसाठी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता यावे यासाठी, आमच्या कार्यातील खर्चामधे बचत करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते साध्य करण्यासाठी विजेवरील खर्चात कपात करणे व हरित ऊर्जेस साहाय्य करणे हा एक मार्ग आहे.

घाटे म्हणाले की, गोव्यात अधिकतर नवीन गोष्ट सहजासहजी स्वीकारली जात नाही. एखादी नवीन वस्तू असेल तर तिचा वापर आपण प्रथम करत नाही. आधी इतरांनी वापरावी व मगच आपण वापरू असेच बहुदा धोरण असते. या महाविद्यालयाचे वैशिष्टय़ म्हणजे एखादी नवीन गोष्ट आमच्या नजरेस आली की आम्ही लगेच ती स्वीकारतो व त्या कामाला लागतो. सौर ऊर्जेची ही कल्पना आम्हाला आवडली व अवघ्या काही महिन्यात याचे काम सुरु होऊन पूर्णही झाले. 

ऑर्बचा स्तुत्य उपक्रम

घरगुती, औद्योगिक आणि शैक्षणिक उपभोक्त्यांना ऑर्बची रुफटॉप सोलर सिस्टीम कोणत्याही अर्थसहाय्याशिवाय तीन ते चार वर्षांचा परतफेड कालावधी देते. जो अर्थसाहाय्य नसलेल्या एका सोलर पॉवर सिस्टीमवरील गुंतवणुकीवर याआधी कधीही न मिळालेला परतावा आहे. कारण भारतातील अनेक व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांना अर्थसहाय्याने रुफटॉप सोलर सिस्टीम परवडू शकत असल्याने परतफेड कालावधीशी जुळणारे अप्रत्यक्ष मोफत सौर कर्ज ऑर्ब देऊ करत आहे. या परतफेड कालावधीनंतर ग्राहकांच्या सोलर सिस्टीमपासून निर्मित सर्व ऊर्जा मोफत असेल.