|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावातील कचरा प्रश्नावर आरोग्य अधिकारी धारेवर

बेळगावातील कचरा प्रश्नावर आरोग्य अधिकारी धारेवर 

राष्ट्रीय हरित लवाद राज्यस्तरिय बैठक, न्या. सुभाष आडी यांनी विचारला जाब

बेळगाव / प्रतिनिधी

राष्ट्रीय हरित लवाद यांच्या निर्देशनानुसार कर्नाटकात स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीची दुसरी बैठक शुक्रवारी बेळगावात पार पडली. येथील जिल्हा पंचायत सभागृहात बेळगाव महसूल विभागातील जिल्हय़ांची विकास आढावा बैठक घेण्यात आली. राज्यस्तरिय समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुभाष आडी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. बैठकीत बेळगावातील कचरा समस्याबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. शशिधर नाडगौडा आणि पर्यावरण खात्याचे साहाय्यक अभियंता उदयकुमार यांना न्यायमूर्ती सुभाष आडी यांनी धारेवर धरले.

बेळगावची स्मार्ट सिटीमध्ये निवड झाली आहे. मात्र शहरातील कचरा समस्या आणि अस्वच्छताबाबत अनेक तक्रारी आहेत. यामुळे कचरा निर्मूलनाबाबत कोणती उपाययोजना करण्यात आली? अशी विचारणा न्यायमूर्ती सुभाष आडी यांनी केली. यावर उत्तर देताना डॉ. शशिधर नाडगौडा यांनी कचरा निर्मूलनाबाबत नागरिकांमध्ये जागृती सुरू असून, रोज गल्लोगल्ली कचरा उचल करण्यासाठी घंटागाडी व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये ओला आणि वाळलेला कचरा विभागून ठेवण्यात येत असून, स्वच्छता कर्मचाऱयांना आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य अधिकारी निरूत्तर

स्वच्छता कर्मचाऱयांना याबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिला आहात का? त्यांच्या समस्या कोणत्या आहेत? त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहात का? अशा प्रश्नांची सरबत्ती न्या. आडी यांनी केली. यावर आरोग्य अधिकारी निरूत्तर झाले. पर्यावरण खात्याचे साहाय्यक अभियंता उदयकुमार यांनीही प्रत्येक वॉर्डात 1 याप्रमाणे एकूण 58 घंटागाडी असल्याची माहिती यावेळी दिली.

घनकचरा निर्मूलन नियमावली 2016, बांधकाम साहित्य व्यवस्थापन कचरा नियमावली 2016, वैद्यकीय कचरा निर्मूलन नियमावली आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमावलीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बेळगाव शहर हे मोठे आहे. मात्र येथील कचऱयाची समस्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत अनेक तक्रारी असल्याचे आडी यांनी यावेळी सांगितले. तसेच महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. नाडगौडा यांना जबाबदार ठरविले. बेळगावातील एकंदरीत परिस्थितीचा अहवाल पाठविण्याची सूचना केली. यावेळी डॉ. नाडगौडा आणि उदयकुमार यांना विविध प्रश्नावरून त्यांनी धारेवर धरले.

जबाबदारी झटकू नका

महापालिका आयुक्त इब्राहिम मैगुर यांनी आपण 15 दिवसांपूर्वी आलो असल्याचे सांगितले. यावर न्यायमूर्ती आडी यांनी जबाबदारी झटकू नका, अशी सूचना केली. तसेच पुढील बैठकीत येताना पूर्ण माहिती आणि अहवाल घेऊन हजर राहण्याची सूचना केली. समितीच्या या विकास आढावा बैठकीत बेळगावसह कारवार, धारवाड, गदग, हावेरी, बागलकोट आणि विजापूर जिल्हय़ातील संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.