|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खडेबाजार शहापूर रस्त्याची खोदाई

खडेबाजार शहापूर रस्त्याची खोदाई 

बेळगाव / प्रतिनिधी

हेस्कॉमच्यावतीने भूमिगत विजवाहिन्या घालण्यासाठी ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात खोदाईचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यांची ‘वाट’ लागत आहे. खडेबाजार शहापूर मार्गावरही भूमिगत विजवाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. यासाठी जेसीबीचा वापर केला आहे. यामुळे खडेबाजार शहापूर रस्त्याची धुळदाण उडाली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी खोदाई केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

सराफ गल्ली कॉर्नरवर मोठय़ा खड्डय़ाची खोदाई केली असून, अनेक दिवसांपासून तसाच ठेवला आहे. तर या ठिकाणी विजवाहिन्या ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काही दिवसापूर्वी खडेबाजार शहापूर मार्गावरील एका बाजूची खोदाई केली होती. आता काही दिवसांपासून दुसऱया बाजूचीही जेसीबीद्वारे खोदाई केली आहे. तसेच विजवाहिन्यांचे मोठमोठे बंडल ठेवल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

बँक ऑफ इंडिया कॉर्नरपासून खडेबाजार शहापूरच्या रस्त्याची यामुळे धुळदाण उडाली आहे. नाथ पै सर्कल शहापूर येथील अंबाबाई देवस्थानापर्यंत रस्त्याच्या बाजूने खोदाईचे काम केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. तर धुळीच्या साम्राज्यामुळे शहापूर येथील दुकानदार, व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. खडेबाजार शहापूरचा रस्ता नेहमीच रहदारीने गजबजलेला असतो. मात्र हेस्कॉमच्या वतीने सुरू केलेल्या खोदाईच्या सत्रामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना दररोज त्रास सोसावा लागत आहे.

एकीकडे हेस्कॉमच्यावतीने खोदाईचे काम सुरू असताना आता एसपीएम रोड येथील छत्रपती शिवाजी उद्यानासमोरील गटारीचे कामही हाती घेण्यात आले आहे. यासाठी जुन्या दगडी बांधकाम असणाऱया गटारीचे दगड काढले आहेत. यामुळे रहदारीस अडथळा ठरत आहे. शहापूर खडेबाजार येथील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर गटारीचे काम करणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.