|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जन्म-मृत्यूचा फेरा ; नोंद अवश्य करा

जन्म-मृत्यूचा फेरा ; नोंद अवश्य करा 

अनंत कंग्राळकर/ बेळगाव

जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे अनिवार्य आहे, शहरात जन्म व मृत्यूची नेंद ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. याकरिता महापालिका कार्यालयात विशेष विभाग आहे. याठिकाणी ब्रिटिशकाळापासून जन्म-मृत्यूच्या नोंदी आहेत. नागरिकांना दाखले देण्यासाठी खिडकीदेखील उपलब्ध आहे. या विभागाचे कामकाज आरोग्य विभागाच्या अखत्यारित येते.

जन्म दाखल्यामुळेच मनुष्याचे अस्तित्व निर्माण होते. जन्म दाखल्याखेरीज कोणतेच काम होत नाही. शिक्षण, नोकरी, विवाह व भारतीय घटनेने दिलेल्या अधिकाराचा लाभ घेण्यासाठी प्रथम जन्मतारीख हवी असते. ही तारीख केवळ जन्म घेतल्याठिकाणी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होते. अंगणवाडी, शाळा, हायस्कूल, महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेताना प्रथम जन्म दाखला विचारला जातो. नोकरीकरिता, मतदार यादी, आधार ओळखपत्र आदीकरिता जन्मदाखला जोडावा लागतो. जन्म दाखल्याखेरीज कोणताच लाभ मिळत नाही.

मनुष्य मृत्यू दाखला हा वारसदारांना आयुष्यभर सोबत ठेवावा लागतो. वारसा सर्टिफिकेट तयार करणे, शासनामार्फत राबविण्यात येणाऱया योजनांचा लाभ घेण्यासाठी, मालमत्तेच्या मालकी हक्कात बदल करण्याकरिता मृत्यू दाखला गरजेचा आहे. याची नोंद ठेवण्यासाठी महापालिका कार्यालयात जन्म-मृत्यू नोंदणी विभाग असून दाखले वितरीत करण्यासाठी याठिकाणी खिडकी उघडली आहे.

आरोग्य विभागाच्या अखत्यारित जन्म-मृत्यू विभागाचे कामकाज चालते. या विभागाचे प्रमुख आरोग्य अधिकारी असून या विभागाचा कार्यभार डॉ. शशीधर नाडगौडा यांच्याकडे आहे. जन्म-मृत्यूची नोंद ठेवणे, नागरिकांच्या मागणीनुसार जन्म-मृत्यू दाखला उपलब्ध करून देणे, जन्म-मृत्यू दाखल्यामधील चुकीची दुरुस्तीसह विविध कामाची जबाबदारी या विभागावर सोपविली आहे. यासाठी दोन महिला कर्मचाऱयांची नियुक्ती केली असून विभागातील कामकाजाची जबाबदारी संध्या सुतळे यांच्याकडे आहे. तसेच जन्म-मृत्यू दाखल्याची नोंद करण्यासाठी डाटा ऑपरेटर नियुक्त केले आहेत. ब्रिटिशकाळापासून जन्म व मृत्यू दाखल्याची नोंद असल्याने  1990 पासून आतापर्यंतच्या जन्म व मृत्यू दाखल्याची नोंद संगणकावर केली आहे. 1990 ज्या आधीच्या जन्म-मृत्यूच्या नोंदी वहीमध्ये आहेत. यामुळे जुने दाखले शोधण्यासाठी दोन कर्मचाऱयांची नियुक्ती केली आहे.

जन्म झाल्यानंतर त्याची माहिती संबंधित रुग्णालयाकडून महापालिकेला देतात. त्यानंतर याची नोंद करून घेतल्यानंतर जन्म दाखला वितरीत केला जातो. पण तो मिळविण्याकरिता जन्म तारीख, आई-वडीलांचे नाव, रुग्णालयाचे नाव व पत्ता द्यावा लागतो. त्याचबरोबर जन्मलेल्या बाळाचे नाव द्यावे लागते. त्यानंतर सर्व माहितीनिशी जन्म दाखला दिला जातो. घरामध्ये जन्म झाला असल्यास याची माहिती नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने महापालिका कार्यालयात द्यावी लागते. पण ती न दिल्यास दाखला मिळत नाही. तसेच जन्माची माहिती महापालिका कार्यालयात दिल्यास स्वच्छता निरीक्षकांकरवी पंचनामा करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जन्म दाखला दिला जातो.

मृत्यूबाबतदेखील अशीच प्रकिया असून रुग्णालयात मृत्यू झाल्यास त्याची माहिती महापालिकेत देण्यात येते. त्यानंतर महापालिकेडून मृत्यू दाखला दिला जातो. महापालिका व्याप्तीमध्ये घरामध्ये मृत्यू झाल्यास त्याची माहिती वारसदारांनी किंवा शेजारील नागरिकांनी महापालिकेला दिल्यास त्याची नोंद होते. पण त्यासोबत आधार ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे. मृत्यू झाल्याची नोंद ठेवण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक स्मशानभूमीत मृत्यू नोंद अर्ज उपलब्ध केले आहेत. यामुळे अंत्यविधीवेळी नागरिकांकडून प्रथम हा अर्ज भरून घेतला जातो. यामुळे मृत्यू दाखला मिळणे सोयीस्कर होते. मात्र घरी मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारांनी याची माहिती महापालिकेला कळविणे बंधनकारक आहेत. घरात मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या आधारकार्डच्या झेरॉक्सप्रतीसह महापालिकेत अर्ज दिल्यास स्वच्छता निरीक्षकांकरवी पंचनामा करून मृत्यूची नोंद केली जाते. अशी विविध प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृत्यू दाखला उपलब्ध होतो. जर जन्म व मृत्यू दाखला महापालिकेत उपलब्ध नसल्यास त्याबाबत शहनिशा करून जन्म व मृत्यु बाबतची नोंद नसल्याचे पत्र महापालिकेकडून देण्यात येते. सदर पत्र मिळाल्यानंतर जन्म-मृत्यूच्या नोंदीकरिता महापालिकेविरोधात न्यायालयात दावा दाखल करता येऊ शकतो. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जन्म-मृत्यूची नोंद महापालिकेत होऊ शकते.

अपघाती मृत्यू झाल्यास….

 अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्याची माहिती रुग्णालयाकडून दिल्यानंतर महापालिका कार्यालयात नोंद होते. पण महापालिका कार्यक्षेत्रात मृत्यू झाल्यास त्याची नोंद महापालिका कार्यालयात होते. काही वेळा अपघातास्थळी क्यक्तीचा मृत्यू होतो. अशावेळी पोलीस प्रशासनाकडून पंचनामा करून नातेवाईकांना उत्तरीय तपासणी अहवाल दिला जातो. जर ग्रामीण भागात अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्यास त्याची नोंद महापालिकेत होत नाही. संबंधितहद्दीच्या ग्राम तलाठय़ांना माहिती देऊन त्यांच्याकडून मृत्यू दाखला घ्यावा लागतो.

चुकांची दुरूस्ती

जन्म-मृत्यू दाखल्यातील चुकांचा फटका नागरिकांना मोठय़ाप्रमाणात बसतो. चुकांची दुरुस्ती करून घेण्यासाठी महापालिका कार्यालयात फेऱया माराव्या लागतात. पण जन्म झालेल्या रुग्णालयाकडून दिलेल्या माहितीनुसार महापालिकेत नोंद केली जाते. यामुळे काहीवेळा स्पेलिंगमध्ये चुका होता. तसेच नाव व आडनावामध्ये चुका होतात. तसेच पत्ता चुकीचा असतो. पण या चुका लवकर लक्षात येत नाहीत. शाळेत प्रवेश घेताना अथवा सरकारी कामकाज करताना या चुका अडचणीच्या ठरतात. चुकांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेकडे धाव घेण्यात येते. प्रतिज्ञा पत्र, ओळखपत्र, शाळेचा दाखला व अर्ज महापालिकेच्या जन्म व मृत्यू दाखला विभागाकडे दिल्यास केवळ स्पेलिंगमधील चुकांची दुरुस्ती आरोग्य अधिकाऱयांच्या मंजुरीनंतर करून देण्यात येते. पण कागदपत्रात तफावत असल्यास दुरुस्ती होत नाही. याकरिता महापालिकेविरोधात न्यायालयात धाव घेऊन चुकांची दुरुस्ती करून घेता येते.

Related posts: