|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दुराचाराचं दहनच महत्त्वाचं!

दुराचाराचं दहनच महत्त्वाचं! 

 ‘मला सुखी व्हायचं आहे. मी फार अस्वस्थ आहे. मला शांती पाहिजे आहे!’ महात्म्यासमोर बसून ‘तो’ आपलं मन मोकळं करत होता. महात्मा डोळे मिटून ऐकत होते. ‘सगळय़ांसाठी मी खूप काही केलं. पण एकजात सारे स्वार्थी आहेत. ना कुणाला माझी पर्वा, ना कुणाला माझी चिंता! असं वाटतं महात्माजी, की सर्वांना हाकलून लावावं किंवा स्वत:च्या हातानं हे सगळं जाळून टाकावं. कधी कुणी पाहिली नसेल अशी होळी पेटवावी!’

  महात्माजीनी डोळे उघडले. ‘त्याच्या’कडं मोठय़ा करुणापूर्ण दृष्टीनं बघत ते म्हणाले, ‘चांगली कल्पना आहे! मोठी होळी ना, अवश्य कर बेटा असंच! हाकलून लावण्यापेक्षा जाळून टाकणंच सोपं! नंतर सुख आणि शांती मिळेल ना?’ क्षणभर त्याला नेमकं काय म्हणावं हे कळलंच नाही. महात्मा गंभीरपणे म्हणाले, ‘असंच तर करत आलोत आपण… आपल्याला जे त्रासदायक वाटतं ते जाळत आलोत आपण! कुणी झालं सुखी? कुणाला मिळाली शांती? नाही, बेटा नाही! कुणी सुखी झालं नाही की कुणाला शांती मिळाली नाही. आपली सुख-शांती नाहीशी करणारं वाईट बाहेर कुठंच नाही. हाकलून लावशील, जाळूनही टाकशील; तरी दु:खीच राहशील. अशांतच राहशील. कारण आपल्या कुणाच्याच दु:ख-अशांतीचं कारण बाहेर मुळीच नाही. ते आपल्या आत आहे. आपण स्वत: ते साठवून ठेवलं आहे. जिवापाड जपून ठेवलं आहे. बाहेरचं जाळून किंवा बाहेरच्यांना हाकलून काय होणार? आत सगळं तसंच असेल!’

  ‘आपण दु:खी होतो, अशांत होतो ते बाहेरच्या परिस्थितीनं नव्हे, आपल्या मन:स्थितीनं! अहंकार, ममत्व, कर्तेपण, काल्पनिक मोठेपण असा कितीतरी पसारा आत भरलेला आहे. त्याला हाकलून लाव. नाहीच गेला तर जाळून टाक अशी मोठीच नाही तर आगळी-वेगळी होळी पेटव! अशा होळीदहनाचा नुसता निश्चय कर. तेवढय़ानंही सुखी होशील. निश्चय पूर्ण करशील तर ईश्वरी शांती मिळेल!’ महात्माजी बोलायचं थांबले. जराशानं ‘तो’ म्हणाला, ‘म्हणजे चूक माझीच? आयुष्यभर खपून मी हे कमावलं, उभं केलं त्याला काहीच किंमत नाही? थोडीही कृतज्ञता नसावी इतरांच्यात?’ आता हताशा आणि संतापाचं मिश्रण होतं त्याच्या बोलण्यात! त्याकडं रोखून बघत महात्माजी म्हणाले, ‘चराचरापेक्षा मोठं काय उभं केलंस? अरे, ज्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं त्याच्याविषयी कितीजण कृतज्ञतेचा भाव मनात ठेवतात? म्हणून तो प्रभू काय हे सगळं जाळून टाकायला निघतो का? तूही काही जाळू नकोस. स्वत:च्या कर्तेपणावर भाळू नकोस. क्षमा करण्याचा धर्म टाळू नकोस! जा एक नेम कर. सर्वांचं क्षेम कर. प्रत्येकावर प्रेम कर. सुखी होशील. शांती मिळवशील.’

  कातडं धुण्यात पुण्य नाही!

  मला पटतं हे! विचार करू तर कुणालाही पटू शकतं. पण विचार करण्याची तसदी कोण घेईल? जाळपोळ त्यामानानं सोपी आणि स्वस्तही असते. आजवर कमी होळय़ा पेटवल्या का? कमी शिमगा केला का? समाज दु:खीच आहे. अशांतच आहे. पूर्वी फाल्गुनापुरतंच होतं होलिकादहन! आता तर बारमाही झालं आहे. ‘आम्ही दु:खी, आम्ही अशांत’ अशी आधी बोंब ठोकायची आणि दिसेल ते जाळत सुटायचं. बाहेरचं जाळायचं. दुसऱयांचं अधिक जोमानं जाळायचं. निरर्थक बहाणे शोधून कुणाला हाकलून लावायचं! विचार-आचारातला असला ‘बाहेरख्यालीपणा’ बंद करायचा मार्ग आहे अध्यात्माचा! सुख असो, दु:ख असो, यश असो, अपयश असो याची कारणं बाहेर नाही आपल्या मनातच असतात. तुकोबारायांनी हेच सांगितलं. गंगेत डुबकी मारून पाप धुतलं जात नाही रे बाबांनो, आपल्या आत ज्ञानाची गंगा अवतरीत केली पाहिजे. स्वत: भगिरथ झालं पाहिजे. भगिरथही तिसऱया पिढीतला होता बरं! आधीच्या दोन पिढय़ांनी गंगा अवतरीत करण्याचा झटून प्रयत्न केला. यश तिसऱया पिढीतल्या भगिरथाला मिळालं. आज आपण आत गंगेचं आवाहन करू…. आपली तिसरी पिढी ज्ञानगंगेनं तृप्त होईल. शांत होईल. सुखीही होईल आणि आपल्या प्रयत्नांना यश आलं तर आपल्याच हयातीत गंगा अवतरेलही, कुणी सांगावं!

  तुकोबाराय म्हणतात, ‘जावूनिया तीर्था काय तुवा केले । चर्म प्रक्षाळिले वरीवरी ।।’ आधी स्वत:च धुळवड खेळायची आणि मग गंगेत डुबकी मारून शुद्ध व्हायचं… हा पोरखेळ कुठवर खेळायचा? कातडं नव्हे आतडं स्वच्छ पाहिजे! कातडं धुण्यात पुण्य नाही. धुवून कायमचं स्वच्छ करावं असं तर आपलं मन आहे. मन टाळून, मन जाळून उपयोग नाही. मन निवळून गेलं पाहिजे. मन निवळतं प्रेमानं. निरपेक्ष प्रेम! मगच आपलं अस्तित्व आतून-बाहेरून रंगून जातं. मगच ‘सबाह्य अभ्यंतरी’  एक दैवी रंगपंचमी खेळली जाते. अवघा रंग श्रीरंग होतो. पांडुरंग होतो. जिथं दु:ख नाही. अशांतीही नाही. पण हे सोपं साधन नाकारून आपण सारं खापर बाहेरच्या कुणा ना कुणावर फोडतो. जगाला दोष देतो. जगानं सुधारावं असा हट्ट धरतो. या धावपळीत आपल्या आत डोकवायला वेळच राहात नाही. वेळ मिळाला तरी आत बघण्याची इच्छाच होत नाही. खरंतर आपण भित्रे असतो. आपल्याला स्वत:च्या आत बघायची भीती वाटत असते.   सुख-शांतीचा सुलभ मार्ग!

  सुख-शांतीचा सुलभ मार्ग आहे अंतर्मुख होणं. अंतर्मुख माणूसच आपल्या दुराचारावर लक्ष ठेवतो. दुराचाराचं दहन हाच खरा होलिकोत्सव आहे हे त्यानं ओळखलेलं असतं. त्यासाठी तो फाल्गुनाची वाट बघत नाही. तपाच्या आगीत तो आतलं अयोग्य जाळत राहतो. पूर्ण नाहीसं होईतो जाळत राहतो. नव्यानं ते पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून अखंड सावधान राहतो. अखंड सावधानता हीच त्याची साधना असते.

 पॉंडिचेरीतील एक प्रसंग आहे. महायोगी अरविंद यांची ती तपोभूमी! तिथंच त्यांनी देहही ठेवला. तिथं त्यांची समाधी आहे. साधक समाधीजवळ बसून ध्यान साधना करतात. असेच काही साधक साधना करत असताना एक अडचण जाणवते. काही अन्य साधक तिथं बोलत असतात, त्याचा ध्यान करणाऱया साधकांना व्यत्यय होत होता. काही दिवस हे सुरू होतं. शेवटी ध्यान करणाऱया साधकांना वाटलं, श्रीमाताजींना आपण याविषयी सांगावं. ते माताजींच्या भेटीला गेले. म्हणाले, ‘माँ, आम्हाला ध्यानावेळी समाधीजवळ बसून गप्पा मारणाऱया काही अन्य साधकांचा त्रास होतो. समाधीजवळ बसून न बोलण्याविषयी आम्ही त्यांना सांगावं का?’ माताजी म्हणाल्या, ‘छान! तुम्ही त्यांना सांगाल तर त्यांना लाभ होईल…… पण न सांगाल तर तुम्हाला अधिक लाभ होईल!’ बस्स, इतकंच कायमचं लक्षात ठेवायला पाहिजे. इतरांचा विचार करण्यापेक्षा आपली अंतरीची दृढता वाढवणं नेहमीच श्रेयस्कर असतं. होलिकोत्सवाचा असा अर्थ लावू तर किती सुखी होऊ ना! अशा खऱया होलिकोत्सवाच्या हार्दिक शुभकामना!!

विवेक घळसासी

Related posts: