|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » चलो गाव की ओर

चलो गाव की ओर 

गेल्यावेळची मोदी लाट आता गायब आहे. पुलवामानंतरची परिस्थिती आपल्या राजकीय फायद्यासाठी शिताफीने वापरून मोदींनी दुसरी टर्म मिळवण्याचा डाव जरूर टाकला आहे. त्याला उत्तर म्हणून राफेल घोटाळा, शेतकऱयांची खस्ता हालत, बेरोजगारी आणि सामान्यजनातील नैराश्य असे बरेच मुद्दे विरोधकांनी आपल्या भात्यातून काढले आहेत.

शेवटी एकदाच्या निवडणुका घोषित झाल्या. पुलवामाचा दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या अनिश्चित परिस्थितीमुळे या निवडणुका वेळेवर होतील की नाही अशी शंका येत होती. युद्धज्वर भडकत होता आणि त्यातून काय भडका उडेल ते सांगता येत नव्हते. पण तसे घडले नाही. सध्याचे राजकीय वातावरणच कायम राहिले तर भारतीय हवाई दलाच्या पाक विरोधी कारवाईमुळे भाजपचे विमान उंंच उडू लागले आहे यात शंका नाही. सत्ताधारी दलात आपल्याला किमान 250 जागा मिळायला हरकत नाही असा आत्मविश्वास दिसून येत आहे. तो कितपत रास्त वा फाजील हे येणारा काळ दाखवेल. पुढील दोन महिन्यात निवडणुका टप्प्याटप्याने होणार असल्याने नवीन कोणते मुद्दे पुढे येणार आणि त्याने चित्र कितपत बदलणार वा कायम राहणार हे ठरणार आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात नरेंद्र मोदींसारखा लोकोत्तर नेता झालाच नाही अशी मोहीम भक्तांनी सुरू केल्याने त्याला औपरोधिक प्रत्युत्तर म्हणून निवडणूक कशाला अशी खोचक प्रतिमोहीम विरोधकांनी सुरू केलेली आहे. एकमेकांना शालजोडीतील देण्याचा मौसम रंगू लागला आहे. भाजपच्या एका खासदाराने तर स्वपक्षीय आमदारावरच जोडय़ाचा अजब प्रयोग केला आहे.

 भाजपचा अश्वमेघी घोडा अडवण्यासाठी विरोधी पक्ष कितपत सुज्ञपणा दाखवणार आणि एकमेकांना साथ देणार त्यावर त्यांचा ‘शेवटचा दिवस’ (मे 23-मतमोजणीच्या दिवस) गोड होणार की नाही हे ठरणार आहे. त्यांनी शहाणपणा दाखवला नाही तर ‘ये रे माझ्या मागल्या’ झाल्याशिवाय राहणार नाही. भाजपाला 200 जरी जागा मिळाल्या तरी नरेंद्र मोदी परत पंतप्रधान होतील असा विश्वास त्यांचे भक्त बाळगतात आणि ते फारसे चुकीचे आहे असे वाटत नाही. येत्या आठवडय़ात विरोधी पक्षांची येथे बैठक भरत आहे, ती महत्त्वाची ठरणार आहे. मोदी-शाह यांच्या विरुद्ध प्रभावी रणनीती कशी बनवयाची यावर या बैठकीत जोर राहणार आहे. 2019ची निवडणूक आपण खिशात घातली आहे असे सत्ताधाऱयांना सध्यातरी वाटत आहे. अशावेळी विरोधक थंड कसे राहू शकतात? या बैठकीत भाजप विरोधी आघाडीची मार्गदर्शक सूत्रे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. किमान समान कार्यक्रम मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यावरच ठरेल असे बोलले जाते.  राज्यांमधून उलटसुलट वृत्ते येत असल्यामुळे निवडणुकीच्या क्षेत्रातील घाग मंडळीदेखील सावध झाली आहेत. भाजपच्या काही समर्थक मंडळींनी केलेल्या पाहणीनुसार उत्तर प्रदेशात गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकानंतरची तिसरी ‘मोदी लहर’ तयार होत आहे. भाजप पहिल्यासारखे आपले प्राबल्य राज्यात दाखवेल असे या पाहणीत आढळून आले आहे. याउलट एका हिंदी चॅनेलने केलेल्या अनौपचारिक पाहणीमध्ये वेगळेच निष्कर्ष बाहेर आले आहेत. उत्तर प्रदेशामध्ये 80 पैकी 16 जागा काँग्रेसला मिळू शकतात आणि बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष युतीस 45. असे जर घडले तर भाजपाला अवघ्या 20 जागा मिळतील.

 येत्या काळात राहुल गांधींच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. गेल्या निवडणुकीत मोदींच्या हातून ते चारीमुंडय़ा चीत झाले होते. नेतृत्व, वक्तृत्व, संघटन आणि प्रचार अशा चार प्रमुख बाबीत तेव्हा मोदींनी जी जबर आघाडी घेतली त्याने काँग्रेस चे पानिपत ठरले होते. 543 सदस्यीय लोकसभेत काँग्रेसला अवघ्या 44 जागा मिळतील असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. सोनिया गांधींनी व्यक्तिशः हा दारुण पराभव जीवाला लावून घेतला होता आणि आता आपल्या मुलाने त्याचा वचपा काढावा अशी त्यांची मनोमन भावना आहे. याकरता त्यांनी प्रियंकाना देखील राजकारणात सक्रिय केले. ‘अभि नही तो कभी नही’ अशा हिरिरीने त्यांना मोदींचा पाडाव करायचा आहे. 2014 चे राहुल हे हरिणीच्या पाडसाप्रमाणे भोळे आणि निरागस होते. मोदींनी त्याना गेल्या पाच वर्षात पार बदलवले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात गांधी-नेहरू घराण्यातील व्यक्तीने प्रथमच संघर्षातून आपले नेतृत्व पैदा केलेले आहे.

काल परवापर्यंत राहुल यांची खिल्ली उडवणारे अरविंद केजरीवाल आता आम आदमी पक्ष आणि काँगेसचा समझोता व्हावा यासाठी गयावया करत आहेत. दिल्लीमधील सातही जागा काँग्रेस लढवणार आहे अशी घोषणा राहुल गांधींनी केली असली तरी आतमधून मात्र केजरीवाल यांच्या पक्षाबरोबर गुपचूप बोलणी सुरू आहेत. जर ही युती समाधानकारकरित्या घडली तर भाजपाला दिल्लीत भोपळा मिळेल. भाजपालादेखील याची चाहुल लागली आहे. म्हणून आपले उमेदवार बदलण्याची त्यांनी तयारी चालवली आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीरला नवी दिल्ली मतदारसंघ देण्याचे बोलले जात आहे. येन केन प्रकारेण आपल्या दुरावलेल्या मित्र पक्षांना परत जवळ ओढण्याचे काम मोदी-शाह यांनी सत्वर सुरू केले आहे. आसाम गण परिषद असो अथवा पूर्वोत्तरेतील इतर छोटे पक्ष असोत, भाजप त्यांची परत साथ घेत आहे. उत्तर प्रदेशातदेखील छोटय़ा पक्षांना त्याने चुचकारले आहे. ‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी’ म्हणत शिवसेनादेखील कळपात राहिली आहे. तर नितीशकुमार यांचे नेतृत्व मोदींच्या बुस्टर डोसशिवाय बिहारमध्ये चालू शकत नाही हे भाजपने दाखवले आहे. दक्षिण भारतात कर्नाटक सोडले तर भाजप इतरत्र असून नसल्यासारखा आहे. 2019 चे महाभारत 2014 पेक्षा वेगळे आहे. त्यावेळा मोदी हे राष्ट्रीय राजकारणात आलेले नवीन नाणे होते. बंदा रुपया होता. पाच वर्षांच्या कारभारानंतर तो तितकाच खणखणीत राहिला आहे असे मानणे धाडसाचे ठरेल.. भाजपने कितीही कंठरव चालवला असला तरी गेल्यावेळची मोदी लाट आता गायब आहे. पुलवामानंतरची परिस्थिती आपल्या राजकीय फायद्यासाठी शिताफीने वापरून मोदींनी दुसरी टर्म मिळवण्याचा डाव जरूर टाकला आहे. त्याला उत्तर म्हणून राफेल घोटाळा, शेतकऱयांची खस्ता हालत, बेरोजगारी आणि सामान्यजनातील नैराश्य असे बरेच मुद्दे विरोधकांनी आपल्या भात्यातून काढले आहेत. कोणालाही सहजासहजी मैदान मारता येणार नाही. या लढाईत दिवसागणिक नवीन रंग भरणार आहेत.

सुनील गाताडे

Related posts: