|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सर्व प्राणी भगवंताच्या अधीन

सर्व प्राणी भगवंताच्या अधीन 

श्रीशुकदेव म्हणतात-राजन, वृत्रासुर रणभूमीवरच आपल्या शरीराचा त्याग करू इच्छित होता. कारण त्याला विजयाहून मृत्यू श्रे÷ वाटत होता. म्हणून प्रलय काळातील पाण्यात कैटभासुर भगवान विष्णूंवर जसा धावला होता, तसा हासुद्धा त्रिशूळ घेऊन इंद्रावर तुटून पडला. प्रलयकालीन अग्नीच्या ज्वाळांसारख्या तीक्ष्ण टोकांचा त्रिशूल फिरवून वीर वृत्रासुराने तो अत्यंत वेगाने इंद्रावर फेकला आणि अतिशय क्रोधाने गर्जना करून तो म्हणाला, ‘नीच इंद्रा, आता तू वाचणार नाहीस.’ तो भयंकर त्रिशूळ ग्रह आणि उल्कांप्रमाणे गोल फिरत आकाशातून आपल्याकडे येणार आहे, असे पाहूनही इंद्राने विचलित न होता त्रिशूळाबरोबरच वासुकी नागासारख्या असलेल्या वृत्रासुराचा विशाल बाहू, शंभर गाठी असलेल्या आपल्या वज्राने तोडून टाकला. एक हात तुटल्याचे पाहून वृत्रासुराला अत्यंत राग आला. वज्रधारी इंद्राजवळ जाऊन त्याने त्याच्या हनुवटीवर आणि ऐरावतावर परिघाने असा आघात केला की इंद्राच्या हातातून ते वज्र खाली पडले.  वृत्रासुराचा हा अत्यंत अलौकिक पराक्रम पाहून देव, असुर, चारण, सिद्धगण इत्यादी सर्वजण त्याची प्रशंसा करू लागले. परंतु इंद्रावर आलेले संकट पाहून तेच लोक वारंवार आक्रोश करू लागले. ते वज्र इंद्राच्या हातातून सुटून वृत्रासुराजवळच जाऊन पडले होते. म्हणून लज्जित होऊन इंद्राने ते पुन्हा उचलून घेतले नाही. तेव्हा वृत्रासुर म्हणाला-इंद्रा! तू वज्र घेऊन तुझ्या शत्रूला मारून टाक. सर्वज्ञ, सनातन, आदिपुरुष, भगवानच जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्यास समर्थ आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर देहाभिमानी आणि युद्ध करू इच्छिणाऱया अविचारी लोकांना नेहमीच विजय मिळतो असे नाही. हे सर्व लोक आणि लोकपाल जाळय़ात अडकलेल्या पक्ष्यांप्रमाणे ज्याच्या अधीन होऊन ही कृत्ये करतात, तो काळच सर्वांच्या जय-पराजयाचे कारण आहे. तो काळच मनुष्याचे मनोबल, इंद्रियबल, शरीरबल, प्राण, जीवन आणि मृत्यूच्या रूपात असतो. ते न कळल्यामुळे मनुष्य जड शरीरालाच सर्वाचे कारण समजतो. इंद्रा, जशी लाकडाची बाहुली आणि यंत्राचे हरिण नाचविणाऱयाच्या हातात असतात, त्याचप्रमाणे सर्व प्राणी भगवंतांच्या अधीन असतात, असे समज. भगवंतांच्या कृपेशिवाय पुरुष, प्रकृती, महत्तत्त्व, अहंकार, पंचमहाभूते, इंद्रिये आणि अंतःकरणचतुष्टय़ हे कोणीही या विश्वाची उत्पत्ती इत्यादी करण्यास समर्थ होऊ शकत नाहीत. भगवंतच सर्वांचे नियंत्रण करतात. हे ज्यांना माहिती नाही, तेच या परतंत्र जीवाला स्वतंत्र कर्ता-भोक्ता मानतात. वास्तविक स्वतः भगवंतच प्राण्यांच्याकडून प्राण्यांची निर्मिती आणि संहार करतात. जसे इच्छा नसतानासुद्धा काल प्रतिकूल असताना मनुष्याला अपकीर्ती इत्यादी प्राप्त होतात, त्याचप्रमाणे काल अनुकूल असताना इच्छा नसतानासुद्धा त्याला आयुष्य, लक्ष्मी, यश, ऐश्वर्य इत्यादी भोग मिळतात. म्हणून यश-अपयश, जय-पराजय, सुख-दु:ख, जीवन-मरण यापैकी कशाचीही इच्छा-अनिच्छा न ठेवता सर्व परिस्थितीत समभावाने राहावे. सत्त्व, रज आणि तम हे गुण प्रकृतीचे आहेत. आत्म्याचे नाहीत.

Ad. देवदत्त परुळेकर

Related posts: