|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बापू ,माढा डोक्यातून काढा

बापू ,माढा डोक्यातून काढा 

प्रतिनिधी/ सोलापूर

ना लढो माढा, आपके लिए पुरा सोलापूर खडा, आपल्या हक्काचा माणूस आपल्याच मतदारसंघात, आमची एकच विनंती, आमच्या हक्काचा नेता हिरावून घेऊ नका, बापू माढा डोक्यातून काढा अशा अनेक घोषणा देत सहकारमंत्र्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवू नये, या मागणीसाठी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या विकासनगर येथील घरासमोर उषोपण केले.

  सहकारमंत्री देशमुख भाजपाच्यावतीने लोकसभा निवडणूक माढा येथून लढविणार याची चर्चा असून, त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर सहकारमंत्र्यांनी त्यांचा विद्यमान दक्षिण सोलापूर हा विधानसभा मतदारसंघ सोडू नये, अशी मागणी करीत सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील नगरसेवक, संरपच, सभापती, कार्यकर्त्यांनी उपोषण केले.

  याप्रसंगी महापौर शोभा बनशेट्टी, उत्तर सोलापूर पंचायत समिती सभापती संध्याराणी पवार, नगरसेवक श्रीनिवास करली, सुभाष शेजवाल, सरपंच कौशल्य सुतार, संभाजी दडे, दक्षिण सोलापूर भाजप तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, इंद्रजित पवार, भैरावअण्णा भैरामडगी, अविनाश मोमडय़ाल, प्रमोद हच्चे, प्रभाकर पडळवकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

दक्षिण तालुक्याला विसरणार नाही

पक्षाकडे माढा लोकसभेचे तिकीट मागितले नाही. परंतु पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा  आदेश असेल तर कुठूनही निवडणूक लढविण्यास तयार आहे. माढय़ाची उमेदवारी अजून निश्चित झाली नाही. त्यामुळे माढय़ाचा प्रश्नच येत नाही. कोठेही गेले तरी दक्षिण तालुक्याला न विसरता विकासकामे करीतच राहीन.