|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बारावीचा आज शेवटचा पेपर

बारावीचा आज शेवटचा पेपर 

प्रतिनिधी/ बेळगाव

उज्ज्वल भविष्याची दिशा देणाऱया बारावी परीक्षा शेवटचा पेपर सोमवारी आहे. इंग्रजी विषयाच्या पेपरने बारावी परीक्षेची समाप्ती होणार असून 2018-2019 या  शैक्षणिक वर्षातील पदवीपूर्व द्वितीय वर्ष संपणार आहे. राज्यात 1 मार्च पासून बारावी परीक्षेला प्रारंभ झाला असून 18 मार्च रोजी परीक्षा संपणार आहे. यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून परीक्षेत आणि अभ्यासात असणारे विद्यार्थी सोमवारी शेवटचा पेपर देणार आहेत.  बेळगाव शैक्षणिक जिल्हयात 34 केंद्रांवर 23 हजार 394 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून या विद्यार्थ्यांचा पदवीपूर्व वर्षाचा टप्पा संपणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीची परीक्षेला लवकर सुरुवात झाली आहे. यामुळे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेतून लवकर मुक्त झाले आहेत. सोमवारी परीक्षेचा शेवटच्या पेपर बरोबरच पदवीपूर्व पर्वातील शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी हा दिवस एन्जॉय करणार आहेत. 2016 या शैक्षणिक वर्षात पेपर फुटीप्रकरणामुळे परीक्षा महिनाभर लांबणीवर पडली होती. मात्र यंदा कोणत्याही गोंधळाशिवाय आतापर्यंतचे पेपर सुरळीतपणे पार पडले असून शेवटचा पेपर देताच विद्यार्थी सुटकेचा निश्वास सोडणार आहेत.

थोडी खुशी थोडा गम…

उपराष्ट्रपती व राज्यपालांच्या दौऱयानिमित्त वाहतुक व्यवस्थतेत बदल करण्यात  आला असून सकाळी 8 ते 2 यावेळेत वाहतुक वळविण्यात आली आहे. यामुळे परीक्षेला येताना तसेच परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मंत्र्यासाठीच्या क्यवस्थेचा  त्रास सहन करावा लागणारा आहे. शेवटच्या पेपरच्या आनंदाला व  उत्साहाला मुरड घालावी लागणार आहे. शेवटच्या पेपरचा आनंद व्यक्त करताना थोडी खुशी थोडा गम असे चित्र पहायला मिळणार आहे. 

सोमवारी शेवटचा पेपर देण्यासाठी विद्यार्थ्यांना 8. 30च्या आत परीक्षा केंद्रांवर पोहचावे लागणार आहे.  इंग्रजी विषयाच्या पेपरची वेळ 10. 30 ते 1.30 आहे. मात्र मंत्र्याच्या दौऱयानिमित्त वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.   यामुळे परीक्षेला वेळेवर पोहचण्यासाठी समस्या जाणवणार आहे.  म्हणूनच परीक्षेची वेळ अचूक पाळण्यासाठी दक्षता म्हणून परीक्षा केंद्रांवर लवकर पोहचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.