|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खानापूरचा बीएसएफ जवान पश्चिम बंगालमध्ये हुतात्मा

खानापूरचा बीएसएफ जवान पश्चिम बंगालमध्ये हुतात्मा 

आज होणार अंत्यसंस्कार : पुढील महिन्यात होणार होता विवाह 

 चापगाव / वार्ताहर

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे रविवारी झालेल्या नक्षली हल्ल्यात बेळगाव जिल्हय़ातील खानापूर तालुक्यातील झाडनावगा येथील बीएसएफ जवान राहुल वसंत शिंदे (वय 24) हा बीएसएफ जवान हुतात्मा झाला. 117 बटालियनमध्ये सेवा बजावत असताना रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्याला प्राण गमवावे लागले. सदर जवानाला बंदुकीच्या तीन गोळय़ा लागल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

हुतात्मा जवान राहुल वसंत शिंदे हा बीएसएफमधील 117 बटालीयनमध्ये कार्यरत होता. त्याचे युनिट पश्चिम बंगालमधील मुख्य सरहद्दीपासून अवघ्या तीनशे मीटरवर आहे. सरहद्दीवर नियमित डय़ुटी करत असताना सकाळी 6.40 च्या दरम्यान नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्याला तीन गोळय़ा लागल्या. गोळीबारानंतर काही वेळातच तो मृतावस्थेत पडल्याचे तेथील जवानांना दिसून आले.

2015 मध्ये सैन्यसेवेत रुजू

वीर जवान राहुल हा 2015 मध्ये बीएसएफमध्ये दाखल झाला होता. प्रारंभी त्याने पंजाबमधील विशालपूर येथे आपले प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्याची बदली जम्मू काश्मीरमध्ये झाली होती. तेथून वर्षभरापूर्वीच तो पश्चिम बंगालमध्ये पुढील सेवेसाठी दाखल झाला होता.

‘लगीनघाई’च्या उंबरठय़ावरच…

गेल्या डिसेंबर महिन्यात राहुल सुट्टीवर आला होता. त्यावेळी त्याचा विवाह चापगाव येथील एका मुलीशी निश्चित झाला होता. सदर मुलीशी त्याचा वाङ्निश्चय सोहळाही पार पडला होता. त्यानंतर कुटुंबियांनी त्याची विवाहाची तयारीही सुरू केली होती. पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये लग्नाचा मूहूर्त ठरवण्यासाठी त्यांची तयारीही चालवली होती. आपल्याला विवाहासाठी रजा आवश्यक असल्याची माहितीही त्याने युनिटमधील संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांना दिली होती. लग्नासाठी तो गावी परतण्याच्या प्रतीक्षेत असताना आणि घरात लगीनघाई सुरू असतानाच राहुलला नक्षली हल्ल्यात प्राण गमवावे लागल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

शिंदे परिवाराची सैन्यदलाशी जवळीक

हुतात्मा जवान राहुल शिंदे यांचे घराणेच भारतीय सैन्यात आहे. त्याचे वडील वसंत दतात्रय शिंदे हे शेतकरी असले तरी मोठा भाऊ रुपेश हा भारतीय सैन्यात आहे. त्याचे काका मधुकर शिंदे, बाळकृष्ण शिंदे हे सैन्यातून निवृत्त झाले आहेत. तर चुलत बंधू रामचंद व दिनेश हेदेखील सैन्यात कार्यरत आहेत. यातून त्याचा संपूर्ण परिवाराच भारतीय सैन्यात असल्याचे दिसून येते.

लवकरच सुट्टीवर येणार : वडिलांशी झाले अखरेचे बोलणे

राहुल हा परिवारातील एक प्रेमळ व हुशार युवक होता. त्याने आपल्या घराण्यातील भारतीय सेनेत असलेल्या काका आणि भावांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवला होता. त्याचे आपल्या गावाशी तसेच पै पाहुण्यांशीही चांगले आपुलकीचे नाते संबंध होते. गेल्या डिसेंबरमधील सुट्टीनंतर आपल्या लग्नाच्या तयारीसाठी त्याचा दररोज घरच्या लोकांशी संवाद असायचा. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या आई-वडिलांशी फोनवरून संवाद साधला होता. “मी लवकरच सुट्टीवर येणार आपण आरामात राहा. आल्यानंतरच लग्नाची तयारी करुया’’ असे त्याचे बोलणे अखेरचे ठरले. अन् सकाळी त्याचा गोळाबारात मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. सकाळी 10 च्या सुमारात मुर्शिदाबादहून एक फोन आला अन् गोळीबारात राहुलचा मृत्यू झाल्याची बातमी घरात कळताच एकच गोंधळ उडाला. अन गाव सुन्न झाले.

आज झाडनावगा येथे अंत्यसंस्कार

हुतात्मा जवान राहुलचे पार्थिव रविवारी दुपारी मुर्शिदाबाद येथून कोलकाता येथे आणण्यात आले. तेथून विमानाने बेंगळूर येथे आणण्यात येणार आहे. तेथून सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पार्थिव झाडनावगा येथे येण्याची शक्यता आहे. त्यानंतर झाडनावगा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.