|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पक्षीय लेटरहेडचा गैरवापर प्रकरणी अदखलपात्र गुन्हा

पक्षीय लेटरहेडचा गैरवापर प्रकरणी अदखलपात्र गुन्हा 

प्रतिनिधी / ओरोस:

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या लेटरहेडचा गैरवापर केल्याची तक्रार रतनभाऊ कदम यांनी ओरोस पोलिसांत दिली आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत संबंधितांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी स्वाभिमान पक्षाला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, वरिष्ठस्तरावरून असे कोणतेही आदेश नसल्याचे सांगत पक्षातील काही नाराजांनी विरोध केला होता.

15 मार्च रोजी सायंकाळी आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या लेटरहेडवर निरीक्षक मधु मोहिते यांनी सही करून रतनभाऊ कदम पक्षीय धोरणाविरोधी भूमिका घेत असल्याने त्यांना अध्यक्ष पदावरून निलंबित करण्यात येत असून गणपत जाधव यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र सोशल मीडियावरून व्हायरल केल्याचा आरोप रतन कदम यांनी केला आहे.

याबाबत पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी संपर्क साधला असता, असे आदेश दिले नसल्याचे त्यांनी दूरध्वनीवरूनच स्पष्ट केले. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाच्या लेटरहेडचा वापर करून चुकीची माहिती पसरविणाऱया संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्यांनी केली होती. याबाबतची तक्रार ओरोस पोलीस ठाण्यात दिली आहे. भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 465 नुसार मोहिते यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रतन कदम यांनी दिली.