|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » अझीम प्रेमजीकडून 1.45 लाख कोटीचे दान

अझीम प्रेमजीकडून 1.45 लाख कोटीचे दान 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

अब्जाधीश उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी विप्रो लिमिटेड मधील आपल्या हिश्श्याच्या 34 टक्के समभागातून मिळणारी कमाई समाजसेवेसाठी देण्याची घोषणा केली आहे. सुमारे 52,750 कोटी रुपयांच्या समभागातून मिळणारा नफा अझीम प्रेमजी फौंडेशनकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. प्रेमजी यांच्याकडून आत्तापर्यंत एकूण 1 लाख 45 हजार कोटी रुपयांची रक्कम सामाजिक कार्यासाठी दान करण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या दानशूरपणामुळे बिल गेट्स, जॉर्ज सोरोस आणि वॉरेन बफे यांच्यानंतर त्यांच्या नावाचा उल्लेख केला जात आहे.

आत्तापर्यंत विप्रो लिमिटेडच्या 67 टक्के समभागातून होणारा फायदा अझीम प्रेमजी फौंडेशनला देण्याचे आश्वासन प्रेमजी यांनी दिले आहे. प्रेमजी परिवार आणि  त्यांच्या ताब्यातील कंपन्यांकडे विप्रो लिमिटेडचा 74 टक्के हिस्सा आहे. द इंडियन फिलांथ्रॉपी 2019 हा बेन अँड कंपनीने नुकताच अहवाल सादर केला आहे. त्यात 2014 पासून आत्तापर्यंत भारतात 10 कोटीहून अधिक रक्कम दान करणाऱयांच्या संख्येत 4 टक्क्यांची घट झाल्याचे नोंदविण्यात आले आहे. प्रेमजी यांनी केलेल्या दानाचा यात समावेश नाही.

प्रेमजी यांनी आत्तापर्यंत सामाजिक कामांसाठी दिलेल्या योगदानाची बरोबरी जमशेदजी टाटा आणि दोराबजी टाटा यांच्या सामाजिक कामांशी होऊ शकते, असे बेन पॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक अमित चंद्रा यांनी सांगितले. गेल्या 10 वर्षात त्यांनी दिलेल्या दानामुळे मागील 150 वर्षांच्या इतिहासात त्यांचे विशिष्ट स्थान प्रस्तापित झाले आहे, असेही ते म्हणाले.

विप्रोचा शिक्षणावर भर

सुमारे 10 वर्षापासून विप्रोने शिक्षणावर भर दिला आहे. देशाच्या दुर्गम भागातील शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. त्याचबरोबर बेंगळूर येथे संस्थेकडून अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीचे संचलनही करण्यात येते. संस्थेच्या उपक्रमांत दिवसेंदिवस वाढ होत आहे, असे अझीम प्रेमजी फौंडेशनचे सीईओ अनुराग बेहर यांनी सांगितले आहे.