|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » सलग सहाव्या दिवशी शेअरबाजार तेजीत

सलग सहाव्या दिवशी शेअरबाजार तेजीत 

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे 71 व 35 अंकांची वाढ

वृत्तसंस्था/ मुंबई

सोमवारी सलग सहाव्या दिवशी भारतातील सर्व शेअरबाजारांमध्ये तेजीचे वातावरण दिसून आले आहे. गेल्या महिन्यात झालेली निर्यातवाढ, त्यामुळे कमी झालेली व्यापारी तूट, जागतिक शेअरबाजारांची सुधारलेली स्थिती इत्यादी घटकांच्या एकत्रित आणि सकारात्मक प्रभावाचा हा परिणाम आहे, असे विश्लेषण तज्ञांनी केले आहे. सोमवारी दिवसअखेर, मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 70.75 अंकांनी वधारून 38,095.07 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 35.35 अंकांनी वधारून दिवसअखेर 11,462.15 अंकांवर स्थिरावला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही वाढ झाली आहे.

सोमवारच्या व्यवहारांमध्ये बजाज फायनान्स या कंपनीचे समभाग वधारले. ही वाढ 2.48 टक्के होती. त्यानंतर पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स, ऍक्सिस बँक, टाटा स्टील, कोटक बँक, इंडसइंड बँक, एटीपीसी, एचडीएफसी बँक, एशियन पेंटस्, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, सन फार्मा आणि येस बँक यांचे समभाग 0.50 ते 2 टक्के पर्यंत वधागले आहेत.

या उलट मारूती सुझुकी, हीरो मोटर, भारती एअरटेल, एचसीएल टेक, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, वेदांता, बजाज ऑटो, टीसीएस, ओएनजीसी, कोल इंडिया, हिंदुस्थान युनिलीव्हर इत्यादी कंपन्यांचे सभभाग काही प्रमाणात घसरले आहेत.

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2018 पासून आतार्यंत निफ्टीमध्ये 15 टक्के अर्थात साधारणतः 1 हजार 500 अंकांची वाढ झाली आहे. अशा प्रकारे वाढ प्रामुख्याने विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या मोठय़ा गुंतवणुकीमुळे होत आहे. भारतातील स्थिती आता गुंतवणुकीसाठी योग्य आहे, असा याचा अर्थ होतो.

जपान आणि चीनमध्ये बँकांमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामुळे जागतिक शेअरबाजारांमध्ये नवा उत्साह संचारला असून तो आगामी काही दिवस तरी टिकून राहणार आहे. त्यामुळे भारतालाही यांचा लाभ होणार असून त्याचा परिणाम म्हणून शेअरबाजारांमधील वृद्धीकडे पाहिले पाहिजे, असा सूर आहे.