|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी

पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी 

दुसऱया टप्प्यासाठी आज अधिसूचना

 नवी दिल्ली / वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सोमवारी निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी करण्यात आली. एकूण सात टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलपासून सुरु होईल. यावेळी 20 राज्यांतील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होईल. 18 एप्रिलच्या दुसऱया टप्प्यात 13 राज्यांतील 97 मतदारसंघ मतदान प्रक्रियेला सामोरे जातील. त्यासाठीची अधिसूचना मंगळवारी जारी केली जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 91 जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यासाठी 25 मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. 26 मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 28 मार्चपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर अंतिम उमेदवार यादी निश्चित होणार आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी पहिल्या टप्प्यात वर्धा, रामटेक, नागपूर, भंडार-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या सात जागांसाठी मतदान होणार आहे.

दुसऱया टप्प्यासाठी आज अधिसूचना

दुसऱया टप्प्यासाठी मंगळवार, 19 मार्चला अधिसूचना जारी होणर असून 26 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 27 मार्चला अर्जांची छाननी होणार आहे. दुसऱया टप्प्यासाठी 18 एप्रिलला मतदान होणार असून महाराष्ट्रातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आदी दहा मतदारसंघांचा समावेश आहे.