|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वाटेगावात श्री वाटेश्वर मंदिरात किरणोत्सव

वाटेगावात श्री वाटेश्वर मंदिरात किरणोत्सव 

वार्ताहर/ वाटेगाव

वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील ग्रामदैवत श्री वाटेश्वर मंदिराच्या सभामंडपातून मुख्य गाभाऱयात सूर्यकिरणे प्रवेश करत शिवलिंगावर पडून किरणोत्सवास प्रारंभ झाला आहे. वर्षातून दोनवेळा हा किरणोत्सव होत असतो. सूर्याच्या उत्तरायणामध्ये होणारा किरणोत्सव सोमवारी दि.18 मार्च पासून सुरू झाला आहे. तो दि.20 मार्चपर्यत सुरू राहणार आहे. हा किरणोत्सव किमान तीन दिवस चालतो. मंदिरातील किरणोत्सव पाहण्यास भाविकांची गर्दी होत आहे.

    वाटेश्वर मंदीर हे पूर्वाभिमुखी असून मुख्य गाभारा ते सभामंडप याचे अंतर अंदाजे 38 फूट आहे. सूर्योदयानंतर सूर्यकिरणे काही वेळ शिवलिंगावर पडतात नंतर ही किरणे श्री वाटेश्वर देवाच्या मुखवटय़ा पर्यंत पोहचतात. हा कालावधी 15 ते 20 मिनिटांचा असतो. वाटेगांव येथे शेकडो वर्षापूर्वी भोगावती नदी गावाच्या मध्यभागातून वाहत होती त्याचे आज ओढय़ात रूपांतर झाले आहे. पश्चिम किनायावर पुरातन हेमाडपंथी हे मंदिर आहे. मंदिराला पूर्व, दक्षिण, उत्तर असे तीन दरवाजे आहेत. कोल्हापूर येथे होणारा अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव हा सूर्यास्तावेळी होतो तर वाटेगाव येथील वाटेश्वर मंदिरात किरणोत्सव सूर्योदयाच्या वेळी होतो. या किरणोत्सवाचा उलगडा तीन वर्षांपूर्वी लागला आहे. 

सप्टेंबर महिन्यातही किरणोत्सव

सप्टेंबर महिन्यातही किरणोत्सव होत असतो. सप्टेंबर महिन्यात 22, 23 व 24 तारखेस किरणोत्सव वाटेश्वर मंदिरात होत असतो. वाटेश्वर मंदिरात श्री वाटेश्वर देवाच्या दर्शनासाठी गेलेल्या तीन भाविकांमुळे या किरणोत्सवाचा उलघडा झाला आहे.