|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खेळाच्या मैदानांचाच खेळ झाला

खेळाच्या मैदानांचाच खेळ झाला 

विनायक जाधव/ सांगली

 ज्या शहरात कला, साहित्य, क्रीडा, ही संस्कृती रूजते, त्या शहराची सांस्कृतिक शहर म्हणून आपोआपच ओळख होते. पण सांगली शहरातील ही क्रीडा संस्कृतीची ओळख सांगलीकरच पुसुन टाकू लागले आहेत. शहरातील भावी पिढीच्या क्रीडा विकासासाठी असणारी दोन्ही मैदाने  खराब झाली आहेत. पण त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. जर शहरातील क्रीडा संस्कृतीच संपू लागली तर या शहरातील भावी पिढी सक्षम आणि बलवान कशी बनेल हा खरा सवाल आहे. भावी पिढी बलवान करायची असेल आणि तिच्यामध्ये क्रीडा संस्कृती रूजवायची असेल तर तिच्यासाठी चांगले मैदाने तयार करण्याची गरज आहे.  सांगलीच्या लौकिकात भर घालणाऱया या मैदानांचाच मात्र सध्या खेळ झाला आहे. त्यामुळे हा खेळ या खेळाडूंनी कोठे खेळायचा हा प्रश्न आहे.

सांगली शहरात महापालिकेच्या मालकीची दोन मैदाने आहेत. त्यामध्ये एक छत्रपती शिवाजी स्टेडियम आणि दुसरे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम या दोन्ही मैदानाची दुरावस्था  झाली आहे.  याठिकाणी खेळाडूंना जीव मुठीत घेवूनच सराव करावा लागतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमकडे तर खेळाडू वळतच नाहीत. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे खेळाडू वळतात पण ज्याठिकाणी जागेची अपुरी व्यवस्था आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूला दुसरीकडून येणारा चेंडू किंवा गोळा लागू शकते. तसेच पळण्याचा सराव करणाऱया खेळाडूला एखादा खेळाडू झेल घेताना धडकू शकतो अशी अवस्था या छत्रपती शिवाजी स्टेडियमची आहे. या शिवाजी स्टेडियमची जागा एकदम अपुरी असताना याठिकाणी शेकडो खेळाडू विविध खेळाचा जीव मुठीत घेवूनच सराव करताना दिसत आहेत. पण याकडे कोण लक्ष देणार.

छत्रपती शिवाजी स्टेडियमचे मैदान अपुरेच

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम हे मैदान खेळण्यासाठी अत्यंत अपुरे असे आहे. याठिकाणी दहा ते बारा क्रिकेटचे नेटस सराव होत असतात. त्यामध्येच ऍथेलेटिक्स, योगासने, जिम्नॅस्टिक, लांबउडी, गोळाफेक, भालाफेक, खो-खो, फुटबॉल, व्हॉलिबॉल या खेळाचा सराव होत असतो. पण या खेळाडूंना सराव करताना हे मैदान पुरेसे आहे का याचा कधी विचार महापालिकेने किंवा क्रीडा संघटकांनी केला आहे का ? या खेळाडूंनी चांगला सराव करावा आणि त्यांनी आपल्या सांगलीसाठी पदक आणावे अशी भाषणबाजी सर्वच जण करत असतात. पण या खेळाडूंना येणाऱया अडीअडचणी आणि त्यांना लागणाऱया सोयीसुविधा सुध्दा देण्यास सांगलीकर मात्र हात मागे घेत आहेत.  या खेळाडूंच्याकडून मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकाची अपेक्षा सहजपणे केली जाते. सध्या खेळांना भरपूर प्रसिध्दी मिळत आहे. पण त्यामानाने या खेळाडूंना सराव करण्यासाठी सोयीसुविधा मात्र मिळत नाहीत. या खेळाडूंना चांगल्या सोयीसुविधा आणि चांगले मैदान तयार करून दिले तरच या खेळाडूंच्याकडून आपण पदकाची अपेक्षा केली तर ते वावगे ठरणार नाही. पण या खेळाडूच्या बाजूच आणि त्याच्या अडीअडचणी कोणी समजावून घेताना दिसत नाही. त्याला मात्र उपदेशाचे डोस पाजण्यात सर्वजण आघाडीवर आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम तर मद्यापींचा अड्डा

महापालिकेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर खेळाडूंची गर्दी होण्याचे कारण म्हणजे महापालिकेच्या मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमकडे महापालिकेचे असणारे पुर्ण दुर्लक्ष होय. या मैदानात कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. मैदान उखडलेले आहे. या मैदानावर गवताचे साम्राज्य झाले आहे. ठिकठिकाणी खड्डय़ात पाणी साचून राहिले आहे, त्यामुळे याठिकाणी कोणताही खेळ खेळाडूंना खेळता येत नाही. त्यामुळे या मैदानात खेळाडू जातच नाहीत. याठिकाणी खेळाडू फिरकत नाहीत त्याचा लाभ मात्र मद्यापींनी चांगलाच घेतला आहे. या मैदानावर सकाळपासुन रिकामटेकडे गटागटाने बसून असतात त्यांनीच या मैदानांचा आता जवळपास ताबा घेतला आहे. मैदानांच्या मधोमध बसून ते खुलेआम दारू पित असतात. त्याबरोबरच त्याचठिकाणी दारूंच्या बाटल्या फोडलेल्या असतात. या मैदानात महापालिकेने खेळाडूंसाठी छोटेसे पॅव्हेलियन बांधले आहे. पण या पॅव्हेलियनच्या काचा फुटल्या आहेत. हे पॅव्हेलियन घाणेघाण झाले आहे. तसेच यामध्ये बसून अनेक रिकामटेकडे  चरस, गांजा घेणारी मंडळी वास्तव्य करून असतात. आता याठिकाणी नवीन पिढी पब्जी खेळतानाही रममाण झालेली दिसते. त्यामुळे हे मैदान म्हणजे खुलेआम एन्जॉय करण्याचे एक ठिकाण झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम खराब होण्याचे कारण

महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमकडे पहिल्यापासूनच दुर्लक्ष केले आहे. याठिकाणी पावसाचे पाणी तसेच परिसरातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी या मैदानातच साठून राहते. या पाण्याचा निचरा करण्याची यंत्रणा याठिकाणी निर्माण करण्यात आली नाही. ही यंत्रणा जर व्यवस्थित निर्माण करण्यात आली असती तर याठिकाणी हे पाणी साचून राहिले नसते आणि हे मैदान व्यवस्थित झाले असते. या मैदानावर सध्या अनेक ठिकाणी पाणी साचून उंचवठे निर्माण झाले आहेत. तसेच गवत उगविले आहे. या मैदानावर खेळ होत नाहीत. त्याचा लाभ प्रदर्शन भरविणाऱया मंडळींनी घेतला आणि या मैदानावर मोठय़ाप्रमाणात व्यावसायिक लाभ होणारी प्रदर्शने भरविण्यात आली त्यामुळे या मैदानात मोठयाप्रमाणात खड्डे काढण्यात आले आहेत. तसेच खडी टाकण्यात आली आहे. त्यामुळे हे मैदान खराब झाले आहे. आता तर या मैदानाचा उपयोग काही मंडळींनी पार्किंगसाठीच सुरू केला आहे त्यामुळे हे मैदान आणखीनच खराब झाले आहे.

तत्कालिन जिल्हाधिकाऱयांनी आराखडा बनविण्याचे आदेश  दिले होते

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या दुरावस्थेबाबत खेळाडूंनी दीड-दोन वर्षापुर्वी आवाज उठविला होता. त्यावेळी या स्टेडियमबाबत आपण लक्ष देवू असे आश्वासन तत्कालिन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी या खेळाडूंना दिले होते. त्यानुसार त्यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना बोलावून हे मैदान दुरूस्तीसाठीचा तातडीने अहवाल देण्याच्या  सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार महापालिकेच्या अभियंत्यांनी याबाबत एक अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला आहे. पण यानंतर या अहवालाचे काय झाले याची कोणालाच माहिती नाही. जिल्हा नियोजन समितीच्यामाध्यमातून या स्टेडियमची दुरूस्ती करण्याचे आश्वासनही तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी दिले होते. पण नेहमीप्रमाणे प्रशासनाची उदासिनता या प्रकरणांत दिसून आली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर दुरूस्तीचा प्रस्ताव रखडला आणि हे मैदान दिवसेंदिवस खराब होत चालले आहे.

छत्रपती शिवाजी स्टेडियमवर तोडलेल्या झाडांच्या फांद्या तशाच

महापालिकेच्या मालकीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या बाजूने रस्त्य़ावर असणाऱया झाडांच्या फांदय़ा विजेच्या वायरीना लागून याठिकाणच्या वायरी तुटतात त्यामुळे वीज मंडळाच्या कर्मचाऱयांनी या स्टेडियमच्या अवतीभवती असणाऱया सर्व झाडांच्या  फांदय़ा तोडून त्या मैदानातच टाकल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून या फांदय़ा मैदानात पडून राहिल्या आहेत. आता या वाळलेल्या फांदय़ामुळे याठिकाणी मोठयाप्रमाणात पालापोचाळा साठून राहिला आहे. तो मैदानात पसरत चालला आहे. त्यामुळे या फांदय़ा टाकल्या आहेत त्या परिसरात खेळाडूंना कोणत्याही खेळाचा सराव गेल्या काही दिवसपासून करता आला नाही. या फांदय़ा काढून टाकण्याची तसदीही कोणी घेतली नाही. त्यामुळे या स्टेडियमवर काहीही टाकले तरी त्याबाबत कोणीही विचारत नाही अशी स्थिती झाली आहे.