|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेतील ऐतिहासिक होलिका संमेलन

मिरजेतील ऐतिहासिक होलिका संमेलन 

मानसिंगराव कुमठेकर / मिरज 

मिरज शहरात होलिका उत्सव थाटात साजरा होत असे. होळीतील अभद्र प्रकार टाळण्यासाठी संस्थानने काही नियम प्रसिध्द केले होते. याकाळात मुलांसाठी खास होलिका संमेलन आयोजित केले जाई. गेल्या दोनशे वर्षांत मिरज शहरात साजऱया होणाऱया होलिका उत्सवासंदर्भातील ऐतिहासिक कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहात आहेत.

फाल्गुन शुध्द पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी या नावाने संबोधण्यात येते. राज्यात विविध प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. वसंत ऋतुच्या आगमनाचे स्वागत रंगांच्या उधळणीने करण्याची ही परंपरा. मिरज शहरात ही होळी ऐतिहासिक कालापासून साजरी होती. संस्थानकालात शहरातील या होळीला आगळे स्वरूप मिळाले. त्यामुळे मिरजेतील होलिकाउत्सव आसपासच्या परिसरात प्रसिध्द होता.

अडीचशे वर्षांपूर्वी होळीचा उत्सव किल्ल्यातील पटवर्धन संस्थानिकांच्या सरकारी वाडय़ाच्या पुढे होत असे. वाडय़ापुढे होलिकादहन केले जात असे. त्यावेळी खाशी मंडळी उपस्थित राहत. उपाध्यांच्याकडून होळीची पूजा केली जात असे. या होळीसाठी करण्यात आलेला खर्च आणि त्यावेळी केलेली कृत्ये याबाबतची माहिती देणारी सन 1772 ते 1948 सालादरम्यानची शेकडो कागदपत्रे मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहेत. संस्थानकाळात राजेसाहेबांच्या वाडय़ातील होलिका उत्सव कसा व्हायचा? त्यासाठी काही नियम ठरवून दिले होते. त्याबद्दलची यादी उपलब्ध आहे. यामध्ये होळीच्या दिवशी वेदशास्त्रसंपन्न उपाध्ये यांनी सायंकाळी साडेसात वाजता होळीची पूजा करणेची, त्यासाठी हळदकुंकू, गंधफुले, 25 शेणी, ऊस, एरंड, गूळ पाच भार, खोबरे पाच भार आणि एक नारळ वापरण्यात येत असे. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य उपाध्ये यांच्या हस्ते दाखविण्यात येई. पूजेबद्दल उपाध्ये यांना एक रूपया दक्षणा देण्यात येई.

होळीच्या या उत्सवात काही अभद्र प्रथा निर्माण झाल्या होत्या. शिवीगाळ करणे, चिखलाचे गोळे उडवणे असे प्रकार शहरात सुरू होते. त्यामुळे अशा प्रथा बंद व्हाव्यात, म्हणून तत्कालीन संस्थानाधिपती गंगाधरराव पटवर्धन (तिसरे) यांनी जाहीरनामा काढून याबाबत सक्त सूचना केल्या होत्या. 1935 मध्ये तत्कालीन दिवाण बी. के. जोशी यांच्या सहीनिशी निघालेला हा जाहीरनामा मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहे.

या जाहीरनाम्यात म्हटले आहे, ‘लवकरच येणाऱया शिमग्यात बीभत्स शब्द उच्चारणे, बोंबलणे वगैरे सांप्रतच्या परिस्थितीस न साजणारे असे जे प्रकार होतात ते हय़ापुढे जनतेने बंद करावेत. सार्वजनिक जागी अगर रस्त्यावर ते प्रकार कोणी करील, बीभत्स शिक्के कपडय़ावर जो कोणी मारील अगर तसे शिक्के मारलेले कपडे जो कोणी अंगावर घालून गावात हिंडेल, सार्वजनिक जागेत जो कोणी दुसऱयाच्या अंगावर त्याच्या इच्छेविरूध्द घाण अगर रंग टाकेल, दुसऱयाच्या मिळकतीची नासधूस करील त्यावर कायदेशीर काम चालविले जाईल. लहान मुलास त्यांच्या शिक्षकांनी व पालकांनी जाहिरनाम्याप्रमाणे वागण्याची समज द्यावी.’  सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर विशेष परवानगीशिवाय होळी करू दिली जात नव्हती.

होळीतील अभद्रपणा व ओंगळपणा कमी व्हावा, म्हणून मिरज संस्थानाने केवळ  जाहीरनामाच काढला नाही. तर, त्याचबरोबर प्रत्यक्ष कृतीही केली. शिमग्याच्या काळात मुलांना वाईट प्रकारापासून परावृत्त करण्यासाठी मिरजेत होलिकासंमेलनाची प्रथा सुरू केली. या होलिकासंमेलनात तरूणांसाठी मैदानी आणि मर्दानी स्पर्धा ठेवण्यात येऊ लागल्या. पाच दिवस हे सामने असत. यामध्ये मिरज गावाला वेढा मारण्याची शर्यत, कुस्ती स्पर्धा, हुतुतु, वजन उचलण्याच्या स्पर्धा असत. या होलिकासंमेलनाची 1921 सालातील एक निमंत्रणपत्रिका मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या संग्रहात आहे. होलिका संमेलनासाठी स्वतंत्र ऑफीसही तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात येत असे. सुरूवातीला मिरज हायस्कूलच्या मुलांपुरते मर्यादीत असणाऱया या संमेलनात पुढे शहरातील अन्य मुलेही सहभागी होऊ लागली.

या होलिकासंमेलनात चक्कर सडकमार्गे शहराभोवती पळण्याची शर्यत खूप  मनोरंजक असे. या संमेलनातील सँडोचे खेळही प्रेक्षणीय असत. गंगाधर रामचंद पाठक उर्फ लांडय़ा पाठक (कै. डॉ. एन. आर. पाठक यांचे ज्येष्ठ बंधू) हे वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी छातीवर 425 पौंड वजनाचा दगड ठेवीत आणि त्यावर एखाद्या वजनदार माणसाला उभे करीत आणि हे वजन अगदी लिलया पेलत. या प्रयोगाबद्दल पाठक यांना होलिकासंमेलनात अनेक बक्षीसेही मिळाली होती.

त्यावेळी शिवजयंती फाल्गुन वद्य तृतीयेला होई. त्यामुळे होलिकासंमलनाला जोडूनच पुढे शिवजंयतीची व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होत. त्यामुळे तत्कालीन तरूणांची मने वाईट गोष्टीपासून क्रीडा आणि बौध्दिक कार्यक्रमाकडे वळविण्यात मिरज संस्थानला या होलिकासंमेलनामुळे यश आले होते. होलिका संमेलनाच्या यशस्वीतेमुळेच भानू तालीम आणि अंबाबाई तालीम या दोन संस्थांनी मैदानी आणि मर्दानी सामन्यांचे आयोजन केले. पुढे अनेक वर्षे हे सामने सुरू होते. मिरजेतील या होलिकासंमेलनातील सामन्यांचे अनुकरण परगावातील विविध संस्थांनीही केले. त्यामुळे तेथेही अशाप्रकारचे सामने होऊ लागले.