|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सामंतांचे गुणगान, साळवींवर टीका

सामंतांचे गुणगान, साळवींवर टीका 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रिफायनरीचा अध्यादेश रद्द करण्यावरून विविध पक्षांमध्ये श्रेयवाद रंगला असताना आता नव्याने स्थापन झालेल्या कोकण शक्ती महासंघाचे अध्यक्ष अशोक वालम यांनी या मुद्यावर शिवसेनेवर ‘बाण’ सोडला आहे. रिफायनरी रद्द करण्यासाठी शिवसेना स्थानिक आमदार राजन साळवी यांचे कसलेच योगदान नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे सेनेचेचे रत्नागिरीतील आमदार उदय सामंत यांचे गुणगान करताना शेवटच्या टप्प्यात रिफायनरी अध्यादेश रद्द करण्यासाठी म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी महत्वाची भुमिका निभावल्याचे सांगितले.

   ‘कोकण शक्ती महासंघा’चे अध्यक्ष अशोक वालम यांनी मंगळवारी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द झाला असून कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेने यामध्ये  निर्णायक भूमिका पार पाडल्याचे त्यांनी सांगितले. गेली 2 वर्षे रिफायनरी प्रकल्प रद्दसाठी आम्ही लढलो. त्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाने या आंदोलनात प्रत्यक्ष उतरून लढा दिला नाही. हा प्रकल्प रद्द व्हावा, यासाठी समितीने सर्वच पक्षांना साकडे घातले होते. अखेर जनरेटय़ापुढे हा प्रकल्प रद्द करावा लागल्याचे वालम यांनी सांगितले.

  काँग्रेसचे आमदार नितेश राणे व आमदार हुस्नबानू खलिफे यांनी रिफायनरीचा विषय सतत लावून धरला होता, असेही वालम यांनी सांगितले.  त्यावेळी त्यांनी सेनेचे आमदार राजन साळवी यांच्यावर सडकून टीका केली. सुकथनकर समिती रत्नागिरीत आली त्याच्या आदल्या दिवशी आमदार राजन साळवी जिल्हाधिकाऱयांकडे का गेले होते, असा सवाल वालम यांनी यावेळी केला. साळवींनी विनाकारण माझ्यावर भाष्य करू, आपल्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे, पण त्यांच्याविषयी मी बोलणार नाही. मात्र माझ्याविषयी बोललात तर इतिहास बाहेर काढेन, असा इशारा वालम यांनी दिला.

  एकीकडे आमदार साळवींवर टीका करणाऱया वालम यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांचे मात्र गुणगाण केले आहे. आमदार साळवी यांनी रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलनात उतरून कधीही मदत केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. पण रिफायनरी अध्यादेश रद्द करण्यासाठी शेवटच्या काही दिवसांत म्हाडा अध्यक्ष, आमदार उदय सामंत यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे वालम यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. सेनेने शेवटच्या क्षणी महत्वाची भूमिका बजावल्याचेही त्यांनी सांगितले.

कोकण शक्ती महासंघ विधानसभेच्या 3 जागा लढवणार

नव्याने स्थापन करण्यात आलेला ‘कोकण शक्ती महासंघ’ विधानसभा निवडणुकीत राजापूरसह 3 जागा लढवणार असल्याचे अशोक वालम यांनी स्पष्ट केले. कोकणात कोणतेही प्रदूषणकारी प्रकल्प येऊ देणार नसल्याचे सांगत कोकणच्या पुढील वाटचालीसाठी सक्षम पर्याय उभार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चारही प्रमुख पक्षाच्या प्रमुखांना आम्ही भेटून आमची भुमिका मांडणार आहोत. जो पक्ष आम्हांला विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा देईल त्याला लोकसभेसाठी आम्ही पाठिंबा देऊ. राजापूरमध्ये आमच्या संघटनेकडे 35 हजार मतदान आहे. त्यामुळे राजापूरमध्ये शिवसेना आणि स्वाभिमान संघटनेने उमेदवार न देता आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी मागणी करणार असल्याचे वालम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.