|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » संजयकाकांना पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी करू

संजयकाकांना पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी करू 

प्रतिनिधी /सांगली :

 सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपातर्फे संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट म्हणजे पाच लाख मताधिक्यानी यावेळी विजयी करू. ताकद लावून इतिहास घडवू असा निर्धार भाजपा आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी पेल्याची माहिती, भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली. विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचे तिकिट जाहीर झाले असल्याने सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहनही करण्यात आले.

भाजपाने सांगली मतदारसंघातील युतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयात घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार बैठकीत देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, जिल्हापरिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, राज्य सरचिटणीस मकरंद देशपांडे, दीपक शिंदे म्हैसाळकर, मुन्ना कुरणे, माजी महापौर विवेक कांबळे, नगरसेवक शेखर इनामदार यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, शिवसेना आणि भाजपाची युती झाली आहे. या युतीच्या प्रचाराचा नारळ कोल्हापूरात रविवार, 24 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, रिपाइंचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत फोडण्यात येणार आहे. या प्रचाराच्या उदघाटन कार्यक्रमाला सांगलीतून युतीच्या सर्व घटक पक्षातील नेते व पदाधिकारी जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाला सध्या चांगले वातावरण आहे. शेतकऱयांची आम्ही केलेली कर्जमाफी, टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनेची पूर्तता याशिवाय मतदारसंघात करण्यात आलेली विकासकामे यामुळे लोक भाजपाच्या पाठीशी आहेत. सन 2014 च्या निवडणुकीत  भाजपाचे उमेदवार असणाऱया संजयकाकांना अडीच लाखांचे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य आता दुप्पट करण्यात येणार आहे. आमच्या उमेदवाराला कोणतीही अडचण नाही. भाजपामध्ये आणि युतीमध्ये समाविष्ट असणाऱया सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलानेच काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारपासून यासंदर्भात प्रत्येक विधानसभानिहाय बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.