|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भिंत पडून तीन महिला ठार

भिंत पडून तीन महिला ठार 

वार्ताहर /खानापूर :

खानापूर तालुक्यातील मोही येथे उन्हाळय़ामुळे घरात गरम होत असल्याने घराबाहेर झोपलेल्या महिलांच्या डोक्यावर शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत पडून एकाच घरातील तीन मायलेकी मयत झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या दुर्घटनेत हौसाबाई विष्णू खंदारे (80), कमल नामदेव जाधव (50) व सोनाबाई विष्णू खंदारे (45) या महिलांचा मृत्यू झाला. तर सावित्री तुळशीराम हसबे या जखमी झाल्या आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने खानापूर तालुका हादरला असून मोही गावावर शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेची खानापूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खानापूर तालुक्यातील मोही येथे धोंडेवाडी रस्त्यावरील रामचंद्र विष्णू खंदारे हे आपल्या आई आणि बहिणींसोबत राहतात. गेल्या सहा ते सात दिवसांपासून उकाडा जाणवू लागल्याने सर्व जण घरासमोरील मोकळ्या जागेत भगवान सिताराम खंदारे यांच्या घराच्या कंपाऊंडच्या भिंतीलगत झोपतात. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे त्याच जागी रामचंद्र खंदारे, हौसाबाई खंदारे, सोनाबाई खंदारे, कमल जाधव आणि सावित्री हसबे हे झोपल्या होत्या. अचानक रात्री तीनच्या सुमारास एकदम आवाज झाल्याने रामचंद्र खंदारे जागे झाले असता बाजूची सिमेंट विटांची भिंत पडल्याचे दिसले. यावेळी त्यांनी आरडाओरडा करून बाजूच्या घरातील लोकांना जागे करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. परिसरातील लोकांनी येऊन विटा उचलून बघितले असता हौसाबाई खंदारे व कमल जाधव जागीच ठार झाल्या होत्या. यात गंभीर जखमी झालेल्या सोनाबाई खंदारे व सावित्री हसबे यांना ग्रामस्थांनी तात्काळ उपचारासाठी करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र वाटेतच सोनाबाई खंदारे यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून रामचंद्र खंदारे व सावित्री हसबे हे थोडक्यात बचावले.

मोही येथील फिर्यादी सुहास बजरंग पवार यांनी या फोन वरून घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर खानापूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एन बी सावंत करीत आहेत.