|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तासगावात पत्नीकडून पतीचा खून

तासगावात पत्नीकडून पतीचा खून 

प्रतिनिधी /तासगाव :

इंदिरानगर झोपडपट्टी येथे चारित्र्याच्या सशंयावरून व सततच्या भांडणाच्या कारणावरून पतीचा पत्नीनेच गळय़ावर चाकूने वार करून खून केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. तासगाव पोलिसांनी तातडीने तपास करून सुमारे बारा तासाच्या आत हा गुन्हा उघडकीस आणला असून याप्रकरणी पत्नीस अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

  कल्लाप्पा ऊर्फ कल्लू शिवाजी बागडी (40) असे खून झालेल्या पतीचे नांव आहे. तर याप्रकरणी त्यांची पत्नी शांताबाई कल्लाप्पा ऊर्फ कल्लू बागडी (35) यांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

      याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तासगावातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे वरील दाम्पत्य राहण्यास आहे. गेल्या काही दिवसापासून कल्लाप्पा बागडी हे क्षयरोगाने आजारी होते. त्यांच्यावर उपचार ही सुरू होते. असे असतानाच गुरूवारी रात्री एकच्या दरम्यान कल्लाप्पा बागडी यांची पत्नी शांताबाई बागडी या तासगाव पोलीस ठाणेत दाखल झाल्या. त्यांनी बुधवारी रात्री 11.30 च्या दरम्यान पती कल्लाप्पा बागडी यांनी क्षयरोगाच्या आजारास कंटाळून लघुशंकेस जातो असे सांगून घराच्या मागील बाजूच्या एका खोलीत जावून स्वतःच्या गळय़ावर चाकूने वार करून घेऊन आत्महत्या केली आहे असे सांगितले. त्यानुसार रात्री उशीरा अकस्मित मयत अशी नोंद करण्यात आली.

    याबाबतचा तपास गतीने सुरू झाला. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तर यावेळी कल्लाप्पा बागडी यांच्या गळय़ावरील जखम मोठी असल्याने पोलीस निरीक्षक सिंदकर यांना खुनाचा संशय आला. त्यामुळे शवविच्छेदन करून वैद्यकीय अहवाल प्राप्त करून घेणेसाठी मृतदेह मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आला.

      दरम्यान, पोलिसांनी मयताचे नातेवाईकांना पोलीस ठाणेत आणून चौकशी सुरू केली. याचवेळी मयताची पत्नी शांताबाई बागडी यांच्याकडे विश्वासात घेऊन पोलीस कॉन्स्टेबल सचिन घाटके, विलास मोहिते यांनी चौकशी सुरू केली सुमारे दोन तास अत्यंत कौशल्यपूर्वक ही चौकशी होत असतानाच शांताबाई यांनी आपण केलेल्या कृत्याचा पाडा वाचला.