|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू 

जिल्हा परिषद आंबेरे खुर्द शाळेतील घटना

प्रतिनिधी/ गुहागर

 शालेय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेजची उभारणी सुरू असताना वीजेचा धक्का बसून 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. यात आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. आंबेरेखुर्द जिल्हा परिषद शाळेत स्टेजसाठी लोखंडी पाईप लावताना त्याचा वीज वाहिनीला स्पर्श होऊन ही ही दुर्घटना घडली.

प्रणव वासुदेव भुवड (आंबेरे, भुवडवाडी खुर्द) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेत सुजल प्रकाश गमरे (13, आंबेरे खुर्द) हा विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ऐन शिमगोस्तवात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शिमगोत्सवानिमित्त चाकरमानी मोठय़ा संख्येन गावात दाखल होता. या कालावधीत शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचा प्रघात बऱयाच गावात आहे. आंबेरे खुर्द जिल्हा परिषद शाळेचाही सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी आयोजित केला होता. 7 वीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेत एकूण 42 विद्यार्थी आहेत. गेले दोन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ग्रामस्थांच्यावतीने स्टेज उभारणीचे काम तर विद्यार्थ्यांची रंगीत तालीम सुरू होती.

शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता शाळा भरली. सायंकाळच्या कार्यक्रमासाठी शिक्षक तालीम घेत होते. शाळेला लागूनच कार्यक्रमासाठी स्टेज तयार करण्याचे काम सुरू हेते. दरम्यान, प्रणव भुवड व सुजल गमरे हे दोघेजण लघुशंका करून वर्गात जात होते. यावेळी एक पालक स्टेजचे काम करत होते. या पालकांना लोखंडी पाईप उभे करण्यासाठी मदतीला हे दोघेजण गेले. याच स्टेजच्या वरून एल. टी. वीज वाहिनी गेली आहे. या मुलांनी घेतलेला पाईप उभा करताना तो कलंडल्याने स्टेजवरून गेलेल्या वीज वाहिनीला पाईपचा स्पर्श झाला. विद्युत भारीत तारेमुळे या दोन्ही मुलांसह त्या पालकालाही वीजेचा जोरदार धक्का बसला.

हा धक्का एवढा जबरदस्त होता की, प्रणव व सुजल हे दोघेही बेशुद्ध पडले. शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी तातडीने या दोघांना आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रणव याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱयांनी जाहीर केले, तर सुजल याला अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुजल याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

आबलोलीत शवविच्छेदनासाठी एमबीबीएस डॉक्टर नाही!

प्रणव भुवड याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे कळताच आंबेरेखुर्दसह आबलोलीतील ग्रामस्थांनीही आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली.  वडील वासुदेव भुवड यांनी मुलाच्या मृत्यूचा जोरदार धक्का घेतला असून  त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्यावरही आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. प्रणवचे शवविच्छेदन करण्यासाठी आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस डॉक्टर नसल्याने कोळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जांगीड यांना बोलावण्यात आले. दरम्यान शवविच्छेदनासाठी कटरही नसल्याने तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातून कटर मागवण्यात आला.

लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱयांची घटनास्थळी भेट

आबेरे खुर्द शाळेतील घटनेची माहिती कळताच पंचायत समितीच्या सभापती पुनम पाष्टे, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सहदेव बेटकर, गटविकास अधिकारी रवींद्र मोहिते, शिक्षण विस्तार अधिकारी डी. डी. इरनाक, पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

शाळेसमोरील वीज वाहिन्या हटवणे गरजेचे 

तालुक्यातील काही शाळांच्या आवारात असलेले वीज खांब व शाळेजवळून गेलेल्या वीज वाहिन्या हटवण्यासाठी ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी पंचायत समिती मासिक सभेत मागणी करत असतात. मात्र, याची महावितरणकडून गंभीर दखल घेतली जात नाही. पाली शाळेच्या आवारात असलेला वीज खांब हलवण्यासाठी गेली दोन वर्षे मागणी होत आहे. मात्र यावर अजूनही कोणती कार्यवाही नाही. मात्र आंबेरे खुर्द शाळेतील या घटनेमुळे शाळेसमोरून गेलेल्या वीज वाहिन्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related posts: