|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रिंगरोडविरोधात शनिवारी विविध गावांतील शेतकऱयांच्या तक्रारी

रिंगरोडविरोधात शनिवारी विविध गावांतील शेतकऱयांच्या तक्रारी 

मण्णूर, काकती, गोजगा आणि उचगाव शेतकऱयांनी नोंदविल्या हरकती

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या 15 दिवसांपासून रिंगरोड जमीन संपादन संदर्भात सुनावणी सुरू आहे. याला सर्वच शेतकऱयांनी कडाडून विरोध केला आहे. शेतकरी आपल्या तक्रारी दाखल करू लागले आहेत. शनिवारी मण्णूर, काकती, गोजगा आणि उचगावच्या शेतकऱयांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जमीन देणार नाही, अशी तक्रार नोंदविली आहे.

रिंगरोडला शेतकऱयांची सुपीक जमीन हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे. जवळपास 32 गावांतील 1200 एकर जमीन या रस्त्यामध्ये जाणार आहे. अनेक शेतकरी यामध्ये भूमीहीन होणार आहेत. त्यामुळे शेतकऱयांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यांनी मोर्चा काढून या बाबतचा निषेध नोंदविला होता. याच बरोबर रिंगरोडविरोधात तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारकडे जवळपास आतापर्यंत 18 गावच्या शेतकऱयांनी आपल्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारी नोंदवून घेऊन आता त्यावर प्रांताधिकारी निर्णय देणार आहेत.

रिंगरोडची काहीही आवश्यकता नसताना शहरापासून 13 कि.मी.वरून हा रिंगरोड केला जात आहे. त्यामध्ये शेतकऱयांच्या सुपीक जमिनीबरोबरच काजू, आंबा व इतर हजारो झाडे जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होणार आहे. तेव्हा रिंगरोडचा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिलेल्या नोटिशीला मुद्देसुद उत्तरे शेतकरी देत आहेत. तरीदेखील आता प्रांताधिकाऱयांच्या भूमिकेवरच शेतकऱयांचे भवितव्य अवलंबून आहे.

शनिवारी मण्णूर, काकती, गोजगा आणि उचगाव या गावांतील अनेक शेतकऱयांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. सकाळपासूनच तक्रार नोंदविण्यासाठी शेतकऱयांनी गर्दी केली होती. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासमोर या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. यावेळी ऍड. शाम पाटील, ऍड. संजय नावगेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.