|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्रीकरांचे कर्तुत्व, कार्यपध्दती व वागणुक हीच कार्यकर्त्यांसाठी शिकवण

पर्रीकरांचे कर्तुत्व, कार्यपध्दती व वागणुक हीच कार्यकर्त्यांसाठी शिकवण 

प्रतिनिधी/ वास्को

दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कार्यमग्न नेते होते. विकास पुरूष होते. आपली कार्यपध्दत, कर्तुत्व  आणि वागणुक याव्दारेच त्यांनी कार्यकर्त्यांना शिकवण दिली. त्यांच्या उंची ऐवढा नेता गोव्यात आजपर्यंत घडलाच नाही अशा शब्दात भाजपाचे नेते व माजीमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी मनोहर पर्रीकर यांना वास्कोत श्रध्दांजली वाहिली.

    वास्को भाजपा मंडळाने शनिवारी वास्कोतील टुरिष्ट हॉस्टेलच्या हॉलमध्ये शोकसभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना आर्लेकर यांनी पर्रीकर यांच्या कार्यपध्तीचा व कर्तुत्वाचा आढावा घेतला. त्यांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही कशी घेतली जात होती याविषयी त्यांनी माहिती दिली. समाजाच्या खालच्या लोकांपर्यंत सेवा पोहेचायला हवी यासाठी ते कार्यरत असायचे. सतत कार्यमग्न हेच त्यांचे प्रमुख बळ असायचे. आजारपणातही त्यांनी कामात खंड पडू दिला नाही. कदाचित त्याना कळले असाव्ंाs. म्हणूनच त्यांनी कामांची घाई केली. आपल्यामुळे कामे अडून राहता कामा नये या जाणीवेनेच ते अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिले असावेत. ते विकास पुरूष होते. त्यांच्यासारखी उंची लाभलेला नेता गोव्याला आतापर्यंत लाभला नाही. त्यांच्या सहवासातील आठवणी व्यक्त करणे अवघड असल्याचे सांगून आर्लेकर यांनी शोक व्यक्त केला.

  या शोकसभेत माजी महसुलमंत्री व गोवा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोजा सहभागी झाले होते. त्यांनीही या सभेत मनोहर पर्रीकरांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यामुळे पर्रीकरांच्या कार्यपध्दतीची आपल्याला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्यासारखा नेता पुन्हा जन्म घेणार काय हा एक प्रश्नच आहे. चांगली माणसे आणि त्यांचे चांगले कार्य कुणी कधी विसरता कामा नये. चांगल्या विषयी बोलणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तीथे कोणत्याही मर्यादा लागत नसतात. पर्रीकरांनीही कोणतेही भेदभाव न बाळगता लोकांची कामे केली. अशा माणसांची आठवण कायम ठेवायला हवी अशा शब्दात त्यांनी पर्रीकरांना श्रध्दांजली वाहिली.

  वास्को मंडळाचे अध्यक्ष राजन डिचोलकर यांनी मनोहर पर्रीकर हे देशाला लाभलेला एक हिरा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. हा हिरा आमच्यातून कायमचा हिसकावला गेल्याचे सांगून दुख व्यक्त केले. भाऊसाहेब बांदोडकरांच्या निधनानंतर 46 वर्षांनी पुन्हा गोवा पोरका झाल्याची भावाना ऍड. राजीव ढवळीकर यांनी व्यक्त केली. पर्रीकरांची दूरदृष्टी, त्यांचे प्रशासन, त्यांच्या योजना, त्यांचा वागण्यातील साधेपणा अशा सर्व गुणांचा उल्लेख करून पर्रीकर हे असामान्य नेते होते असे ऍड. ढवळीकर म्हणाले. आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही या सभेत मुख्यमंत्र्यांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.

   या सभेत नगरसेवक दीपक नाईक, उद्योजक अतुल जाधव, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवराम लोटलीकर, अखिल भारतीय मल्ल्याळी असोसिएशनचे अध्यक्ष टी. रवीशंकर, बंजारा समाजाचे शिवाजी चव्हाण, सैनिक कल्याण संघटनेचे उपाध्यक्ष अनिलकुमार राय, मच्छीमारी बोट मालक संघटनेचे सिडनी फुर्तादो यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयी भावना व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली. जयंत जाधव यांनी सुत्रसंचालन केले.

Related posts: