|Friday, August 23, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याने महिला सरपंचाच्या पतीची हत्या

पुण्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याने महिला सरपंचाच्या पतीची हत्या 

ऑनलाईन टीम / पुणे :

ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याने हत्येचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पत्नीचा पराभव झाल्याने जिंकून आलेल्या महिला सरपंचाच्या पतीची कारने धडक देऊन हत्या करण्यात आली होती. पुण्यातील आंबेगाव खुर्द येथील 13 जानेवारीची ही घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सरपंच मिनाक्षी वनशिव यांचे पती बाळासाहेब वनशिव यांची हत्या करण्यात आली होती. बाळासाहेब त्यांचे मित्र प्रकाश टिळेकरसोबत फिरायला गेले होते. मुंबई-बंगळुरु महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडने जात असताना एका पांढऱया रंगाच्या कारने त्यांना जोरात धडक दिली आणि वेगाने निघून गेली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब वनशिव यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाळासाहेब वनशिव यांच्या पत्नी सरपंच मिनाक्षी वनशिव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तसेच अविनाश कांबळेवर संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन जवळील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्याआधारे अविनाश कांबळे आणि नितीश थोपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हय़ाची कबुली दिली. मयत बाळासाहेब वनशिव यांच्या पत्नी मीनाक्षी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत अविनाश कांबळे यांच्या पत्नी रेश्मा कांबळे यांचा पराभव केला होता. याच रागातून अविनाश कांबळेने बाळासाहेब वनशिव यांच्या अंगावर गाडी घातली होती आणि अपघाताचा बनाव केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.