|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पहिल्या वळिवाच्या हजेरीतून सुखद गारवा

पहिल्या वळिवाच्या हजेरीतून सुखद गारवा 

निपाणी/संकेश्वर

वाढलेला उष्णतेचा पारा, जमलेले ढग, थांबलेले वारे या सर्वाचा संगम होताना सोमवारी सायंकाळी निपाणीसह परिसरात वर्षातील पहिल्या वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धातास या पावसाने सर्वत्र पाणी पाणी केले. हा पाऊस ऊस पिकासाठी लाभदायक ठरला. पण शाळू, गहू, हरभरा अशा हाती येणाऱया पिकांसाठी मात्र मारक ठरला. मात्र वाढत्या उष्म्यात सुखद गारवा देण्यासाठीही हा पाऊस पूरक ठरल्याने समाधान व्यक्त होत होते.

निपाणीसह परिसरात रविवारपासून उष्मांकात प्रचंड वाढ झाली होती. सोमवारीही तीच परिस्थिती होती. पण सर्वजण रंगोत्सव साजरा करण्यात मग्न होते. रंगोत्सव साजरा करून सायंकाळनंतर सर्वजण दैनंदिन कामकाजात मग्न झाले असतानाच अवकाशात ढग दाटून येताना विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट व सोसाटय़ाच्या वाऱयासह वळिवाच्या पावसाला सुरुवात झाली. अनपेक्षितपणे अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडताना जनजीवन विस्कळीत झाले.

हा अनपेक्षित पाऊस वाढत्या उष्म्यात सुखद गारवा देणारा ठरला. त्याचबरोबर उगवण होणाऱया ऊस पिकासाठी पोषक ठरला. पण हाताशी येत असणाऱया शाळू, हरभरा, गहू अशा रब्बी पिकांसाठी मारक ठरला. यामुळे पिकांचे नुकसान होणार आहेच. पण त्याचबरोबर शिवारातील शाळू पिकाच्या चाऱयाचेही मोठे नुकसान शेतकऱयांना सोसावे लागणार आहे. यामुळे पहिल्या वळिव पावसाच्या बरसातीतून शेतकऱयांची चिंता वाढली आहे.

संकेश्वर परिसर

गेल्या आठ दिवसापासून उष्म्यात प्रचंड झालेल्या वाढीने सोमवारी दुपारी वळिव पावसाने जोरदार हजेरी लावली. संकेश्वर, हुक्केरी व कणगले या परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक पडणाऱया पावसाने शेतकऱयांसह सर्वांचीच धांदल उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. सकाळपासून हवेत कमालीचा उष्मा निर्माण झाला होता. उन्हाची तीव्रता नसतानाही दमट वातावरण व टप्प्याटप्प्याने जमू लागलेल्या ढगाळी वातावरणाने वातावरण काहीसे दूषित बनले होते. दुपारी 3.30 वाजता कणगले परिसरात पावसाला सुरुवात झाली. 4.30 वाजता हुक्केरी शहरात हजेरी व सायंकाळी 6.30 वाजता संकेश्वर शहराला पावसाने चांगलेच झोडपले. दाट जमून आलेल्या ढगांनी कालोख निर्माण झाला व क्षणार्धात वादळी वाऱयासह विजेच्या कडकडाटात वातावरण पूर्णपणे पावसाळी हंगामासारखे निर्माण झाले. दरम्यान मुसळधार पावसाने चांगलीच सुरुवात झाली. या पावसाने रात्री उशिरापर्यंत हजेरी लावली होती. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

सुखद गारवा

गेल्या दोन महिन्यात सकाळपासून सायंकाळपर्यंत उष्म्याचे वातावरण व रात्री गारवा अशा संमिश्र वातावरणाने नागरिक घाईला आला होता. गेल्या आठदिवसापूर्वी हवामानात बदल होऊन सकाळपासून सायंकाळपर्यंत कडाक्याच्या उन्हाने थैमान घातले होते. त्यामुळे उष्णजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. सोमवारी सकाळपासून उन्हाची तीव्रता कमी झाली. पण दमट वातावरणाने उष्णतेचा पारा उंची गाठला होता. दुपारी जमलेल्या ढगांनी गडद असा काळोख निर्माण झाला व पावसाने जोरदार धडक दिली. यामुळे कमालीचा सुखद असा गारवा निर्माण झाला होता.

Related posts: