|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » श्रीस्थळ मल्लिकार्जुन देवालयाचा शिर्षारान्नी उत्सव साजरा

श्रीस्थळ मल्लिकार्जुन देवालयाचा शिर्षारान्नी उत्सव साजरा 

प्रतिनिधी/काणकोण

श्रीस्थळ-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवालयाच्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेला शिर्षारान्नी उत्सव 26 रोजी थाटात झाला आणि त्याचबरोबर काणकोण तालुक्यातील शिमगोत्सवाचीही सांगता झाली. दक्षिण गोव्यातील एक प्रसिद्ध असा हा उत्सव असून या उत्सवास हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. राज्याचे उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनीही उपस्थिती लावून कौल घेतला.

कण्वमुनीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या काणकोण तालुक्यातील श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थान हे गोव्यातील प्राचीन मंदिरांपैकी एक मंदिर आहे. पार्वतीच्या विरहाने व्याकुळ झालेला भगवान शंकर पार्वतीचा शोध घेत ज्यावेळी येथे आला त्यावेळी त्याची अवस्था क्रौंच पक्षाप्रमाणे झाली होती. याच भागात भगवान शंकराची पार्वतीशी भेट झाली असे मानले जाते. म्हणून या भागाला क्रौंचक्षेत्र असेही संबोधले जाते. श्री मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासनाधिश्वर महापती, काणकोण या नावाने हे मंदिर प्रसिद्ध आहे.

श्रीस्थळ येथील परिवार दैवतांमध्ये अवतार पुरुषाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. आसाळी, खालवडे व भाटपाल या तीन घरवयांमध्ये देवस्थानची विभागणी झालेली असून पौष शुद्ध पौर्णिमेच्या रात्री अवतार पुरुषाची तरंगे त्यांच्या तिन्ही स्थानातून अवसर घेऊन निघतात व श्रीस्थळ येथे येऊन एकमेकांना भेटतात. याच अवसराला अवतार पुरुष असे म्हणतात. भाविक यावेळी अवतार पुरुषाकडून कौल-प्रसाद घ्यायला गर्दी करत असतात.

तरंगांचा कर्नाटकात संचार

त्यानंतर देवाची तरंगे कर्नाटकातील तरंगा मेटापर्यंत म्हणजे शिवेश्वरपर्यंत जात असतात. कर्नाटकातील विविध भागांमध्ये विखुरलेल्या श्री मल्लिकार्जुन देवाच्या भाविक व कुळाव्यांना भेट देऊन प्रत्येक ठिकाणी तळया स्वीकारण्यात येतात. जवळजवळ अडीच महिने पायी प्रवास केल्यानंतर आसाळी, खालवडे, भाटपाल, श्रीस्थळ, किंदळे, बाबरे, पाटणे, भगतामठ, आगोंद, गुळे या ठिकाणी देवाचा अवतार होत असतो.

शिमग्याच्या जत्रोत्सवानिमित्त एका वर्षाच्या अंतराने शिर्षारान्नी आणि वीरामेळ हे प्रमुख उत्सव होत असतात. यंदाचे वर्ष हे शिर्षारान्नीचे आहे. त्यापूर्वी 24 रोजी दिवजांचा उपवास, तर 25 रोजी दिवजांची भोवरी झाली. या दिवजांच्या भोवरीत पालिकाक्षेत्र आणि आगोंद येथील श्री मल्लिकार्जुन देवाच्या भाविक, कुळावी महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. रात्री पालखी, गुलाल, सुंवारी आणि 26 रोजी दुपारी तुलाभार, तर संध्याकाळी 4 वा. प्रमुख शिर्षारान्नीचा उत्सव थाटात झाला.

शिर्षारान्नी उत्सवाचे स्वरूप

तीन शिरांची रांधण आणि शिसवीचे लाकूड यावरून शिर्षारान्नी हा शब्दप्रयोग आला असावा असा अंदाज केला जातो. देवालयाच्या राजांगणात अंगावर चंदनाचा लेप लावून गडे व भगत येतात. यावेळी देवाची सहाही तरंगे कोणताही आधार न घेता सरळ उभी राहतात. तीन गडय़ांच्या दंडावर गरे टोचले जातात आणि याच गडय़ांच्या डोक्याचा चूल म्हणून उपयोग करून त्यावर मातीचे भांडे ठेवले जाते आणि त्यात तांदूळ घातले जातात. शिसवीच्या लाकडाचा विस्तव तयार केला जातो.

गडय़ावर अवसर आल्यानंतर भगतापैकी एकाच्या अंगात अवसर येऊन तो दाढेत सुपारी घेऊन खाली बसतो. दुसरा भगत त्याच्या डोक्यावर धारदार खड्गाने प्रहार करतो. डोक्यातून रक्त येते. ते रक्त शिजविलेल्या भातात कालविले जाते. हा भात आजूबाजूला शिंपडला जातो. मात्र भाविकांवर तो पडू नये याची खबरदारी घेतली जाते. त्यानंतर उत्सवाची समाप्ती होते आणि कौल-प्रसाद घ्यायला सुरुवात होते. ही प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत चालू असते. यावेळी श्री मल्लिकार्जुन देवाची सहाही तरंगे कोणताच आधार न घेता सरळ उभी ठेवण्यात येतात. ही किमया पाहण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. या उत्सवासाठी गोव्याप्रमाणेच कर्नाटक, महाराष्ट्रातून अनेक भाविक आवर्जुन आले होते. वडामळ ते श्रीस्थळपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती.

Related posts: