|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नगर्से – काणकोण येथे 30 लाखांची दारू जप्त

नगर्से – काणकोण येथे 30 लाखांची दारू जप्त 

प्रतिनिधी /काणकोण :

पोलीस उपअधीक्षक किरण पुडुवल यांनी काणकोणचे निरीक्षक सुदेश नार्वेकर यांच्या साथीने नगर्से-काणकोण येथील लिकर प्लाझा या घाऊक दारूविक्री दुकानावर छापा मारून अंदाजे 30 लाखांपेक्षा अधिक किमतीची देशी बनावटीची दारू जप्त केली. मागच्या आठवडय़ात पोळे येथे अबकारी खात्याने ज्या दुकानावर छापा मारून पावणेसहा लाख रुपयांची दारू जप्त केली होती त्या सुनील नाईक याच्याच मालकीचे हे दुकान असून जोसेफ सिल्वा नावाची व्यक्ती सदर दुकान चालवत असल्याची माहिती पुडुवल यांनी दिली.

  मागच्या एका वर्षापासून सदर व्यक्ती विनापरवाना हा व्यवसाय करत होती. मार्च, 2018 मध्ये त्याचा परवाना रद्द झाला होता. मात्र काणकोणच्या अबकारी कार्यालयाने मागच्या एका वर्षात सदर दुकानाची एकदाही तपासणी केली नाही. त्यामुळे ही कारवाई पोलिसांना करावी लागली. पोळे येथे दारू पकडण्यात आल्यानंतर नगर्से येथील सदर दुकानाची माहिती आपल्याला मिळाली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राबविण्यात येणाऱया मोहिमेचा एक भाग म्हणून हा छापा मारण्यात आलेला असून जप्त करण्यात आलेला संपूर्ण साठा पंचनामा केल्यानंतर अबकारी कार्यालयाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, असे पुडुवल यांनी स्पष्ट केले.

दुपारी 2 च्या सुमारास हा छापा मारण्यात आला आणि रात्री 8 पर्यंत तपासणीचे काम चालू होते. मडगाव-कारवार मार्गानजीक मध्यवर्ती ठिकाणी दुमजली असे हे दुकान आहे. अबकारी कार्यालय आणि पोलिसांनी सध्या मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर दारू पकडण्याचे सत्र चालविले असून राष्ट्रीय महामार्गावरील विशेषता लोलये पंचायत क्षेत्रातील दारूची दुकाने बंद करण्याचा आदेश अबकारी कार्यालयाने दिलेला आहे. त्याचबरोबर रात्री 10 नंतर जी आस्थापने सुरू असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

विनाहेल्मेट चालकांवर कारवाई

याचवेळी उपअधीक्षक पुडुवल यांनी विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱया 50 पेक्षा अधिक चालकांना तालांव दिला. दरदिवशी हेल्मेट न वापरल्यामुळे कित्येक दुचाकीस्वार हकनाक बळी जात असतात. तरी देखील काही युवक हेल्मेट डोक्यावर न घालता हातात घालतात, काही जण सरळ डिकीत ठेवतात. केवळ जागृतीसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: