|Friday, November 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » माया न तरवें जीवां

माया न तरवें जीवां 

ज्ञानेश्वर माउली पुढे म्हणतात-इथे आणखी एक चमत्कार आहे. या माया नदीच्या भयंकर प्रवाहातून बाहेर पडावे अशी इच्छा पुष्कळांना होते पण फारच थोडे लोक पैल तीराला पोहचतात. कारण या बाबतीत अडचण ही आहे की जे जे उपाय करावे त्या त्या उपायातच अपायांची बीजे दडलेली असतात. उपाय अगदी खात्रीचा म्हणून ते लोक प्रयत्न करू पाहतात आणि पदरात पडते दुसरीच अनपेक्षित गुंतवणूक. स्वतःच्याच बुद्धीच्या भरवशावर जे ह्या नदीच्या पलीकडे जाण्याच्या ईर्षेने हात मारत निघाले ते कुठे बुडले याची नावनिशाणीही मागे उरत नाही. काहींना ज्ञानाच्या डोहात गर्वानेच गिळून टाकले. किती एकांनी वेदत्रयांच्या सांगडीचा आश्रय केला पण मीपणाचे धोंडेही बरोबर घेतले. मग ती सांगड बुडत, तरत पुढे जाताजाता मदरूपी मोठय़ा माशांनी त्यांना सबंधच गिळून टाकले. किती एकांनी तारुण्याचा कासपेटा कमरेला बांधला होता आणि ते मदनाच्या कासेला लागले होते तर विषयमगरांनी त्यांना चघळून टाकले. काहीजण म्हातारपणी लाटेत लपून असणाऱया बुद्धिभ्रंशरूपी जाळय़ाने चहू बाजूंनी वेढले जात शोकरूपी कडय़ावर आपटतात. क्रोधरूपी भोवऱयातून ज्या ज्या ठिकाणी वर येतील त्या त्या ठिकाणी संकटरूपी गिधाडाकडून टोचले जातात. काहीजण दु:खरूपी चिखलाने भरून जाऊन मरणाच्या जाळय़ात फसतात. कामाच्या कासेला लागलेले वाया जातात. यज्ञरूपी पेटी बांधून माया नदी तरून जाण्याची कोणी कामना करतात. थोडा वेळ पाण्यावर तरंगतातही पण मग स्वर्गसुखाच्या कपारीतच अडकून पडतात. कर्मठपणाच्या बाहूंचा भरवसा धरून काही लोक पोहण्याचा प्रयत्न करू लागतात. पण विधिनिषेधाच्या आवर्तातच फिरत राहतात, पुढे प्रवासच घडत नाही. माया नदीत वैराग्याची नाव टिकवून धरून पलीकडे नेणे फार कठीण आहे. विवेकाच्या वेळूला ह्या नदीच्या खोलपणाचा अंदाज येणे दुरापास्त आहे. एकटय़ा जीवाच्या प्रयत्नाने ही माया नदी तरून जाता येणे हे अशक्मयप्राय आहे. अपथ्यशील माणसाची व्याधी बरी होणे, सज्जनास दुर्जनाची बुद्धी कळणे, लोभी पुरुषाने चालून आलेल्या ऐश्वर्याचा अव्हेर करणे हे जसे अशक्मय तसेच हे आहे. चोरांना सभा जिंकता येईल काय? मासा गळ पचवू शकेल काय? भित्रा मनुष्य पिशाच्चावर हल्ला करील काय? लहान पाडसाने पारध्याचे जाळे तोडले, मुंगीने मेरू पर्वत ओलांडला, तरच मायेचा पैलतीर जीवांना पाहता येईल. म्हणौनि गा पंडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तेवीं मायामय हे सरिता । न तरवें जीवां । पंडुसुता, कामुक जसा स्त्रीच्या पाशातून सुटू शकत नाही तसाच जीव ह्या माया नदीतून केवळ आपल्या प्रयत्नाने तरून जाऊ शकत नाही.  इथे ज्ञानेश्वर माउलींनी मायानदीचे केलेले जे वर्णन आहे ते एकप्रकारे मानवी मनाचेच वर्णन आहे हे आपल्याला सहज लक्षात येईल. माया तरून जाणे म्हणजे मनावर विजय मिळवणे किती अवघड आहे याचेही विस्तृत वर्णन माउलींनी इथे केले आहे.

Ad. देवदत्त परुळेकर

Related posts: