|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतीय उपग्रहाचे झाले 400 तुकडे : नासा

भारतीय उपग्रहाचे झाले 400 तुकडे : नासा 

फिरणाऱया अवशेषांमुळे अंतराळ स्थानकाला धोका :  शक्ती मोहिमेबद्दल चिंता व्यक्त

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन 

भारताच्या शक्ती मोहिमेदरम्यान उपग्रह नष्ट करण्यात आल्याने त्याचे 400 तुकडे झाले असून अंतराळाच्या कक्षेत ते फिरत आहेत. या तुकडय़ांमुळे आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि त्यात राहणाऱया अंतराळवीरांना धोका निर्माण झाल्याचे नासाने म्हटले आहे.

भारतीय संरक्षण संशोधन संस्थेने (डीआरडीओ) 27 मार्च रोजी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. या चाचणीत 300 किलोमीटर अंतरावरील उपग्रह नष्ट करण्यास यश मिळाले होते.

10 सेमीच्या 60 तुकडय़ांचा शोध

भारतीय उपग्रहाच्या तुकडय़ांचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पण आतापर्यंत 10 सेमी किंवा त्याहून मोठय़ा 60 तुकडय़ांना ट्रक केल्याची माहिती नासा प्रमुख जिम ब्राइडनस्टाईन यांनी दिली आहे. यातील 24 तुकडे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकानजीक फिरत असून ही बाब धक्कादायक ठरू शकते. उपग्रह नष्ट केल्यानंतर त्याचे अवशेष आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या वरच्या बाजूला पोहोचल्याने चिंता निर्माण झाली आहे. अशाप्रकारच्या हालचाली भविष्यात मानवी अंतराळ मोहिमेसाठी योग्य ठरणार नाहीत. आम्हाला ही कृती अस्वीकारार्ह असून नासाची भूमिका याप्रकरणी अत्यंत स्पष्ट असल्याचे ते म्हणाले.

कालौघात कमी होणार धोका

अमेरिकेच्या सैन्यानुसार आतापर्यंत 10 सेमीहून मोठे सुमारे 23 हजार तुकडे शोधण्यात आले असून ते अवशेषांच्या स्वरुपात फैलावले गेले आहेत. यातील 3 हजार तुकडे 2007 मध्ये चिनी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रामुळे निर्माण झाले आहेत. अंतराळ स्थानकांना हे तुकडे धडकण्याचा धोका 44 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. पण काळानुसार हा धोका कमी होत जाणार आहे. वायुमंडळात प्रवेश करताच हे तुकडे जळून खाक होणार असल्याचे नासा प्रमुखांनी म्हटले आहे.

अमेरिकेची भूमिका

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (पेंटागॉन) भारताच्या शक्ती मोहिमेच्या हेरगिरीचा आरोप फेटाळला होता. भारतासोबतच्या सहकार्याला आम्ही चालना देत आहोत. याचाच परिणाम म्हणून सध्या व्यापार आणि भक्कम अर्थव्यवस्थेचे दृश्य दिसून येत असल्याचे विधान पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी केले आहे. भारत ए-सॅट चाचणी करणार असल्याचे अमेरिकेला ज्ञात होते. भारताकडून माहिती मिळाल्यावर आम्ही विमाने रोखली होती अशी माहिती अमेरिकेच्या वायुदलाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली आहे.