|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सेना-भाजप कधी गद्दारी करत नाही!

सेना-भाजप कधी गद्दारी करत नाही! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

सेना व भाजपचा स्वाभीमानचे उमेदवार नीलेश राणे यांनाच आतून पाठिंबा असल्याचे खासदार नारायण राणे यांचे विधान म्हणजे भूलथापा आहेत. सेना-भाजप कधीच गद्दारी करत नाही. नीलेश राणेंचे डिपॉझिट रद्द होण्याची भीती वाटत असल्याने राणे काहीही बोलत सुटले आहेत. त्यांच्या आरोपाकडे  लक्ष द्यायचे नसून विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवायची असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नीलेश राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर प्रचारसभेत बोलताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सेना-भाजपचा नीलेश यांना आतून पाठिंबा असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना खासदार राऊत यांनी सांगितले की, सेना-भाजप कधीही गद्दारी करत नाही. ज्या खंबाटा कंपनीत भ्रष्टाचाराचे आरोप नीलेश राणे यांनी केले आहेत, त्याच कंपनीत त्यांचे बंधू नितेश राणे युनियन चालवत होते. कंपनीच्या ऍग्रीमेंटवर नितेश राणेंच्यादेखील सहय़ा असल्याचा खळबळजनक खुलासा राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला असून त्याचे पुरावेही असल्याचे त्यांनी सांगितले.

खंबाटा कंपनीत भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र समर्थ संघटना, ऑफीसर असोसिएशन अशा तीन युनियन कार्यरत होत्या. या तिन्ही युनियनच्या सहय़ा ऍग्रीमेंटवर आहेत. नितेश राणे यांच्या संघटनेकडून अडीचशे कोटी रूपये कामगारांना देणे असून ‘चोराच्या उलटय़ा बोंबा’ सुरू असल्याचे राऊत यांनी सांगितले. आपल्याला नॉनमॅट्रीक म्हणणारे नारायण राणे हे इन्कमटॅक्समध्ये साधे चपरासी होते. त्यांना हा शब्द पण लिहिता येत नाही, मात्र टीका करता येते. त्यांच्यासारखे खालच्या पातळीवर जावून आपण कधी वागलो नाही आणि वागणारही नाही.  समाजाचा विकास करताना विरोधाला सामोरे जावेच लागते, हे गृहीत धरून आपण पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही खंबीर पाठिंबा असल्याचे राऊत यांनी सांगितले. संसदेत राणे यांनी केवळ 19 वेळा हजेरी लावली असून आपण 122 वेळा हजर होतो. यावरून त्यांचा राजकीय अभ्यास कळतो, असाही टोला राऊत यांनी लगावला.

या निवडणुकीत नीलेश राणे यांना स्पर्धक मानतच नाही. आमची स्पर्धा काँग्रेसशी असेल असे राऊत यांनी सांगितले. नीलेश राणेंनी निवडणूक अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेला आलेल्या माणसांमध्ये रत्नागिरीतील मोजकीच होती. कोल्हापूर, रायगड, मुंबई येथील गाडय़ा रत्नागिरीत आल्या होत्या. यावरून त्याची सध्याची अवस्था दिसून येते. राणेंना पराभवाची खात्री झाल्यानेच सेना-भाजपवर आरोप करत सुटले आहेत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंसह मुख्यमंत्री आपल्या प्रचारसभेला येत आहेत. त्यामुळे राणेंना पोटशूळ उठल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला विनायक राऊत यांसह मुंबई सहसंपर्कप्रमुख, सिंधुदुर्ग सहसंपर्क, जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रभारी नगराध्यक्ष बंडय़ा साळवी उपस्थित होते.

Related posts: