|Sunday, September 22, 2019
You are here: Home » Top News » लोकशाहीत अल्पसंख्यांक दहशतीखाली का?

लोकशाहीत अल्पसंख्यांक दहशतीखाली का? 

 

 

 

पुणे / प्रतिनिधी :  भारतात सर्वकाही आलबेल आहे असे म्हटले जाते, पंरतु, हे साफ चुकीचे असून लोकशाही पद्धतीमध्ये भारतातील अल्पसंख्यांक दहशतीखाली का असा परखड सवाल आंतरराष्ट्रीय किर्तीच्या इंग्रजी लेखीका नयनतारा सहगल यांनी उपस्थित केला.

आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाऊंडेशन यांच्यातर्फे दिवगंत भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त लोकनेते ‘भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार’ लेखिका नयनतारा सहगल यांना प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे नयनतारा सहगल प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्यामुळे त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे पुरस्कार वितरण सोहळय़ात उपस्थितांशी संवाद साधला. लेखिका नयनतारा सहगल यांच्या अनुपस्थितीत सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक किरण नगरकर यांनी लेखिका नयनतारा सहगल यांच्यावतीने पुरस्कार स्विकारला. कष्टकऱयांचे नेते बाबा आढाव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य होते. यावेळी व्यासपीठावर पन्नालाल सुराणा, डॉ. प्राची रावळ, लक्ष्मीकांत देशमुख, जयंत मटकर, प्रा. विलास वाघ, डॉ. नितीन केतकर, प्रा. गीतांजली वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी व्हिडोओद्वारे संवाद साधताना नयनतारा सहगल म्हणाल्या की, अल्पसंख्यांक दहशतीखाली आहेत हे कशाचे लक्षण आहे? खोट्या आरोपांखाली त्यांना जेलमध्ये डांबले जात आहे आणि गुंड मोकाट वावरत आहेत. तुमच्या श्रद्धांबाबत कोणी प्रश्न उपस्थित केला की, लगेच आपल्या विरोधातला आहे असे समजून एकतर त्याला ऐनकेन प्रकारे तुमच्या विचारधारेशी जुळवुन घेण्यास भाग पाडले जाते. अन्यथा त्यांचा दाभोळकर, कुलबुर्गी, गौरी लंकेश केला जातो. आमच्या सोबत या, अन्यथा परिणामांना सामोरे जा असे वातावरण अनुभवायास मिळत आहे. अशाने घटनेची पायमल्ली होत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तर पदोपदी पायमल्ली होत आहे. शाळा, महाविद्यालय स्तरांपासून बुद्धीभ्रम करण्याचे षडयंत्र सुरु आहे. कला-साहित्य-संगीत सर्वच कला सरकारच्या रडारवर आल्या असून तेथे कोणी सरकार विरोधात काही करत तर नाही ना, यावर लक्ष दिले जात आहे.