|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अब्दुललाटच्या चैतन्य स्कूलने केले दोन विश्वविक्रम

अब्दुललाटच्या चैतन्य स्कूलने केले दोन विश्वविक्रम 

वार्ताहर /अब्दुललाट :

येथील चैतन्य पब्लिक स्कूलचा विद्यार्थी राजवर्धन यादव याने सलग 14 तास 22 मिनिटे लेग स्टेचिंग करत आणि याच विद्यालयातील 202 विद्यार्थ्यांनी 30 मिनिटांत 1 लाख 71 हजार 700 स्टमक सिटअप् काढत प्रशालेच्या नावावर एकाच वेळी दोन विश्वविक्रम नोंदविले. ग्रामीण भागातील एखाद्या शाळेने एकाच वेळी दोन विश्वविक्रम नोंदविणारे चैतन्य स्कूल एकमेव ठरले असून या विश्वविक्रमामुळे प्रशालेचे आणि अब्दुललाटचे नाव सातासमुद्रापार पोहचत जगाच्या नकाशावर नोंदले गेले आहे. येथील नेताजी क्रीडा मंडळाच्या भव्य मैदानात या विक्रमाची नोंद झाली असून वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे चीफ एडीटर पवन सोळंकी यांनी या विक्रमाची घोषणा केली असून त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी फटक्यांची आतषबाजी केली.

येथील चैतन्य पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच सैनिक प्रशिक्षण दिले जाते. विविध क्रीडा व बौद्धिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आहेत. संस्थेचे संस्थापक डॉ. दशरथ काळे आणि प्राचार्य शरद काळे यांच्या प्रचंड इच्छाशक्तीने आणि संस्थेचे प्रशिक्षक विश्वनाथ शिसोदे यांच्या अथक प्रयत्नातून हे विश्वविक्रम नोंदले गेले.

लेग स्टेचिंग आणि स्टमक सिटअप् या क्रीडा प्रकारात विश्वविक्रम करण्याचा संकल्प संस्थेचे संस्थापक डॉ. दशरथ काळे, प्रा. शरद काळे, क्रीडा प्रशिक्षक विश्वनाथ शिसोदे यांनी केला होता. लेग स्टेचिंगमध्ये यापूर्वीचा 12 तासांचा विक्रम होता. तर स्टमकमध्ये वेगवेगळ्या विद्यालयातील 200 विद्यार्थ्यांनी 1 लाख 20 हजार स्टमक सिटअप् काढले होते. हा विक्रम मोडण्याचा संकल्प विद्यालयाने घेतला होता.

येथील नेताजी क्रीडा मंडळाच्या मैदानावर इयत्ता आठवीतील राजवर्धन यादव रविवारी पहाटे साडेपाच वाजता लेग स्टेचिंग करून बसला रात्री आठ वाजेपर्यंत सलग 14 तास 22 मिनिटे स्टेचिंग करीत त्याने विक्रम नोंदविला. इयत्ता 4 थी ते 11 वी पर्यंतच्या एकूण 202 विद्यार्थ्यांनी अवघ्या 30 मिनिटांत 1 लाख 71 हजार 700 स्टमक सिटअप् काढत विक्रम केला. विक्रम पूर्ण होताच संयोजक व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी केली.