|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हॉटेल तपासणीस विरोधानंतर पोलिसांना पाचारण

हॉटेल तपासणीस विरोधानंतर पोलिसांना पाचारण 

वार्ताहर/ कणकवली

कणकवलीतील नरडवे नाक्यावरील एका परप्रांतीयाच्या हॉटेलमध्ये सामोसे बनविण्यासाठी कुजके बटाटे वापरण्यात येत असल्याचा प्रकार येथील सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांनी गुरुवारी उघडकीस आणल्यानंतर शुक्रवारी या हॉटेलची अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने तपासणी करण्यात आली. सदर हॉटेलमधील अन्न व्यवसाय थांबविण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे. न. पं. च्या मुख्याधिकाऱयांनीही या हॉटेल मालकाला नोटीस बजावली आहे. यावेळी काँग्रेसचे काही कार्यकर्ते व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

नरडवे नाक्यावरील त्या हॉटेलात सामोसे व बटाटेवडे बनविण्यासाठी कुजक्या बटाटय़ांचा वापर केला जात असल्याची बाब महेश सावंत यांनी गुरुवारी उजेडात आणली होती. त्यानंतर सावंत यांनी याबाबत शुक्रवारी अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच कणकवली मुख्याधिकारी यांच्याकडे नगरसेविका मेघा सावंत यांच्यावतीने तक्रार दिली होती. मुख्याधिकाऱयांना तक्रार देताना नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, भुषण परुळेकर उपस्थित होते. निवेदतान म्हटले आहे,  शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार या हॉटेल व्यावसायिकाकडून केला जात आहे. त्यामुळे या हॉटेल व्यावसायिकाची चौकशी करून कारवाई क्हावी.

मुख्याधिकारी उकिर्डे म्हणाले, नगर पंचायतीच्यावतीने शहरातील सर्वच हातगाडय़ांवरील खाद्यपदार्थ व आईक्रीम विपेते यांची संयुक्त तपासणी करण्यात येईल. सर्वांना फिल्टर पाणी व खाद्य पदार्थातील वस्तू चांगल्या दर्जाचे वापरण्याचे आदेश देण्यात येतील. ज्यांच्याकडे परवाना नसेल, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दरम्यान याबाबत उकिर्डे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित हॉटेल चालकाला नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. ज्या जागेत हॉटेल व्यवसाय सुरू आहे, तेथील गाळय़ाचे कागदपत्र व हॉटेल व्यवसायासाठी दाखला, हॉटेल चालविण्याचे लायसन, संबंधित गाळय़ाचा बांधकाम परवाना व भोगवटा प्रमाणपत्र आदी कागदपत्र घेऊन 8 एप्रिल रोजी न. पं. मध्ये उपस्थित राहण्याचे आदेश संबंधिताला देण्यात आल्याची माहितीही मुख्याधिकारी उकिर्डे यांनी दिली.

शुक्रवारी दिवसभरात ही प्रक्रिया सुरू असताना सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे, अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा खरात, प्रियांका वाईकर यांनी त्या हॉटेलच्या तपासणीसाठी भेट दिली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आतिष जेठे यांनी या पथकाला तपासणी करण्यास अटकाव करीत संबंधित हॉटेलची तपासणी करण्यापूर्वी तुमच्याकडे याबाबत तक्रार आहे का दाखवा? मोठय़ा हॉटेल व्यावसायिकांना सोडून तुम्ही या लहान व्यावसायिकांवर कारवाई करता, असे सांगत त्या हॉटेलची तपासणी करण्यास विरोध केला. त्यावर या हॉटेलबाबत तक्रार प्राप्त असून तक्रारदाराचे नाव जाहीर करता येत नाही, असे शिंगाडे यांनी सांगितले. तसेच आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही संबंधित हॉटेलची तपासणी करू शकतो. तक्रार नसली, तरीही तपासणी करण्याचे अधिकार या विभागाला आहेत. शहरातील जर अन्य मोठय़ा हॉटेलमध्ये अशा प्रकारे निकृष्ट अन्नपदार्थ वापरले जात असतील, तर तुम्ही त्या बाबत तक्रार द्या. त्यावर निश्चितच कारवाई करू, असे शिंगाडे यांनी सांगितले. मात्र जेठे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शिंगाडे यांनी कणकवली पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेठे यांच्यासोबत चर्चा करीत अन्न व औषध प्रशासनाला त्यांचे काम करू द्या. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. यावेळी जेठे व कोळी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने त्या हॉटेलची तपासणी करण्यात आली.  

परवाना न घेता हॉटेल सुरू केल्यास कारवाई

हॉटेलच्या तपासणीनंतर शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या हॉटेलमध्ये कुजके बटाटे असल्याचे आढळून आले. तसेच सामोस्यांसाठी वापरण्यात येणारे मैद्याचे पीठ आंबलेल्या स्थितीत, कुजकट वास येत असलेले होते. त्यामुळे हे दोन्ही अन्न पदार्थ नष्ट करण्याची सूचना त्या हॉटेलच्या कामगारांना करण्यात आली. तसेच हॉटेल व्यावसायिकाकडे हॉटेल लायसन नसल्याचे शिंगाडे यांनी सांगितले. त्यामुळे तातडीने अन्न व्यवसाय थांबविण्याची नोटीस संबंधिताला बजावण्यात आली. या हॉटेल व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दंडाची रक्कम न भरता व आवश्यक परवानगी न घेता हॉटेल सुरू केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे शिंगाडे यांनी सांगितले.