|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आश्वासनानंतर उघडले आरोग्य केंद्राचे ‘टाळे’

आश्वासनानंतर उघडले आरोग्य केंद्राचे ‘टाळे’ 

प्रतिनिधी/ देवगड

थकित बिलापोटी मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राला ठेकेदाराने ठोकलेले टाळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या आश्वासनानंतर शनिवारी दुपारी उघडण्यात आले, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष कोंडके यांनी दिली. ठेकेदाराने 30 मार्च रोजी आरोग्य केंद्राला टाळे ठोकले होते. सहाव्या दिवशी हे टाळे उघडण्यात आले.

मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीसाठी दोन कोटी 36 लाख रुपये खर्च करण्यात आला असून तत्कालिन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते या आरोग्य केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले आहे. मात्र, ही इमारत ज्या ठेकेदाराने उभारली, त्या ठेकेदाराला कामाची 25 टक्के रक्कम अद्यापही अदा करण्यात आलेली नाही. शिवाय, त्याच्याकडून या इमारतीचा रितसर ताबाही प्रशासनाने घेतलेला नाही. इमारतीच्या कामाची उर्वरित रक्कम मिळण्यासाठी ठेकेदाराने पाठपुरावा केला होता. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने 30 मार्च रोजी ठेकेदाराने इमारतीला टाळे ठोकले.

जिल्हा आरोग्य अधिकाऱयांचे आश्वासन

शनिवारी दुपारी तालुका वैद्यकीय अधिकारी कोंडके यांनी मोंड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन ठेकेदाराशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिफे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यात आला. त्यांनी संबंधित ठेकेदाराला त्याच्या कामाची उर्वरित रक्कम त्वरित अदा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ठेकेदाराने डॉ. कोंडके व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरोग्य केंद्राचे टाळे उघडण्यात आले.