|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मालवणचा ट्रॉलर समुद्रात बुडाला

मालवणचा ट्रॉलर समुद्रात बुडाला 

खडकावर आदळल्याने बोटीत पाणी घुसले : ट्रॉलर वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

मच्छीमारांची दुर्घटनास्थळी धाव

पाचही कामगारांना वाचविण्यात यश

बोटीचे 20 लाख रुपयांचे नुकसान

पोलीस गस्ती नौकांचे सहकार्य

प्रतिनिधी / मालवण:

 निवती रॉक परिसरात खडकावर आदळून मालवण येथील मासेमारी ट्रॉलर बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास घडली. वायरी येथील तपस्वी मयेकर यांच्या मालकीचा ‘दर्यासागर’ हा ट्रॉलर मासेमारीसाठी आज सकाळी गेला होता. बोटीवर असणाऱया रत्नागिरी येथील तांडेलासह पाच खलाशांना वाचविण्यात निवती व मालवण येथील पोलीस गस्ती नौकांना यश आले.

  बोट बुडत असल्याचे निवती रॉक येथील कर्मचाऱयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ वेंगुर्ले पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. वेंगुर्ले पोलिसांनी निवती पोलिसांशी संपर्क साधत निवती येथील दोन गस्ती नौका व ट्रॉलर, मालवण येथील गस्ती नौका घटनास्थळी आणण्यात आल्या. सागरी गस्त विभागाचे पोलीस उपनिरीक्षक तेली, पोलीस हवालदार बी. ए. गिरकर यांच्यासह मालवण येथील पोलीस गस्ती नौका, मच्छीमार, स्थानिक मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेतली. बोटीवरील तांडेलने मालक मयेकर यांनाही माहिती दिल्याने त्यांनीही तातडीने निवती परिसरातील मच्छीमारांना मदतीसाठी सहकार्य मागितले होते. मच्छीमारांच्या सहकार्याने बोटीवरील सर्व कर्मचारी सुखरुप असून बोटही दुसऱया बोटीला बांधून ठेवण्यात आली होती. बोट वाचविण्यासाठी मदतकार्य जोमाने सुरू होते.

पाचही कर्मचारी सुखरुप

 बोटीवरील पाचही मच्छीमारांना किनाऱयावर सुखरुप आणण्यात यश आले. बोटीवरील तांडेल दिलीप गणपत वडवकर, खलाशी दत्ताराम लक्ष्मण तारकर, विलास बाळू मांडवकर, प्रदीप जाधव (चारही रत्नागिरी), मोरेश्वर दगडू बारजे (लांजा) हे पाचही मच्छीमार सुखरुप असल्याची माहिती निवती सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. साळुंखे, पोलीस हवालदार व्ही. बी. कांबळी यांनी दिली.

20 लाख रुपयांचे नुकसान

  एलईडी, पर्ससीन आणि हायस्पीड बोटींच्या आक्रमणामुळे मच्छीमारांना मासळी मिळत नसतानाच्या पार्श्वभूमीवर खडकाळ भागावर आदळून दर्यासागर बोट दुर्घटनाग्रस्त झाल्याने मयेकर यांचे सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. बोटीमध्ये पाणी घुसल्याने बोटीतील सर्व जाळी आणि साहित्य वाहून गेले. बोट बांधून समुद्रात उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बोटीतील पाणी काढण्यात यश न आल्यास बोटीला जलसमाधी मिळण्याचीही भीती आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती आहे. या दुर्घटनेमुळे मयेकर कुटुंबियांना धक्का बसला आहे.

मालवणातील मच्छीमारांची धाव

  मयेकर यांची बोट दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळताच दांडी आवार, राजकोट, मेढा येथील मच्छीमारांनी तात्काळ बोटींच्या सहाय्याने निवती रॉक परिसर गाठला आहे. तेथे बोटीच्या आत उतरून पाणी आत येत असलेल्या ठिकाणाची दुरुस्ती करण्यात येत होती. दोन ते तीन ठिकाणच्या फळय़ा खडकाळ भागावर आदळून तुटल्याने पाणी बोटीत शिरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे फळय़ांची दुरुस्ती करून तेथे पत्रा मारण्यात येणार आहे. त्यानंतर दोन बोटींच्या मधोमध दुर्घटनाग्रस्त बोट बांधून ठेवण्यात येणार आहे. ही बोट वाचविण्यासाठी मालवणातील मच्छीमारांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

पालकमंत्र्यांकडून तात्काळ दखल

  मालवण दौऱयावर आलेल्या पालकमंत्री दीपक केसरकर यांना शिवसैनिकांनी ट्रॉलर बुडाल्याची माहिती दिली. त्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक आणि निवती पोलिसांशी संपर्क साधून मदतकार्य पोहोचविण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांच्या गस्तीनौका तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. सर्व कामगारांना किनाऱयावर आणण्यातही यश आले.