|Sunday, December 8, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » लोकसभा निवडणूक निकालाला होणार विलंब

लोकसभा निवडणूक निकालाला होणार विलंब 

विधानसभेच्या 5 मतदान केंद्रावर होणार ‘व्हीव्हीपॅट’-‘ईव्हीएम’ पावत्यांची मोजणी  : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील ‘ईव्हीएम’शी जोडलेल्या ‘व्हीव्हीपॅट’ (व्होटर व्हेरीफारबल पेपर ऑडिट्रेल) मशीनमधील पावत्यांची मोजणी केली जावी, असा आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. मतदारांची निवडणूक प्रक्रियेबाबतची विश्वासार्हता अधिक दृढ होण्यासाठी हा निर्णय घेतल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील एकाच मतदान केंद्रावर पावत्यांची मोजणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. दरम्यान, या आदेशाची अंमलबजावणी केले जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

  मतदानादिवशी ‘ईव्हीएम’शी जोडण्यात येणाऱया ‘व्हीव्हीपॅट’मधील पावत्यांची मोजणी केली जावी, अशी मागणी असणारी याचिका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्त्वाखाली 21 विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. तसेच एकुण मतदानापैकी 50 टक्के मतदानाची पडताळणी करावी, असेही म्हटले होते. या याचिकेवरील सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’शी जोडण्यात येणाऱया ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी केली जावी, असा आदेश दिला.

 यापूर्वी विधानसभेच्या एकाच मतदान केंद्रावरील ‘ईव्हीएम’शी जोडण्यात येणाऱया ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी होत होती. अशा प्रकारे देशातील 4125 मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’शी जोडण्यात येणाऱया ‘व्हीव्हीपॅट’ पावत्यांची मोजणी होत होती. आता ही संख्या 20 हजार 625 इतकी होईल.  सुमारे 6.75 लाख ‘ईव्हीएम’च्या ‘व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करावी, अशी मागणी केली होती. मात्र 50 टक्के ‘ईव्हीएम’ला जोडलेल्या ‘व्हीव्हीपॅट’ मशीनमधल पावत्यांची मोजणी केल्यास लोकसभा निवडणूक निकालास सहा दिवस विलंब होईल, असे निवडणूक आयोगाने न्यायालयात स्पष्ट केले होते. मात्र सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची तत्काळ अंमलबजवणी केली जाईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले.

काय आहे ‘व्हीव्हीपॅट’…

मतदार ‘ईव्हीएम’ मशीनवर आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबतो. त्यावेळी उमेदवारच नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेले व्हीव्हीपॅट स्लिप (पावती) सात सेंकदांमध्ये मतदाराला दिसते. यानंतर ती पावती कट होऊन काचेच्या पेटीत जमा होते. जमा झालेली पावतीमुळे मतदानबाबत खात्री होते. ‘व्हीव्हीपॅट’ मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱयांनाच असतो.

Related posts: