|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » वर्ल्डकपसाठी भारतीय संघनिवड 15 एप्रिलला

वर्ल्डकपसाठी भारतीय संघनिवड 15 एप्रिलला 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

आगामी आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघनिवड सोमवार दि. 15 एप्रिल रोजी केली जाईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले. प्रशासक समितीने बीसीसीआय पदाधिकाऱयांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. विश्वचषकासाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 23 एप्रिलपर्यंत आहे. मात्र, त्या मुदतीच्या आठ दिवस आधीच भारत आपला संघ जाहीर करेल. यंदाची आयसीसी विश्वचषक स्पर्धा दि. 30 मे ते दि. 14 जुलै या कालावधीत इंग्लंडमध्ये होणार आहे.

विश्वचषकाच्या दृष्टीने एक-दोन जागांचा अपवाद वगळता भारतीय संघाचे शिलेदार कोण असतील, हे जवळपास निश्चित मानले जाते. या एक-दोन जागांवर कोणते खेळाडू निवडले जाणार, याची मात्र निश्चितच उत्सुकता असणार आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या बैठकीत वर्ल्डकप संघनिवडीची तारीख निश्चित करण्याबरोबरच अन्य काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले.

आयपीएल फायनल हैदराबादला?

पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे आयपीएलची फायनल दि. 12 मे रोजी चेन्नईत खेळवली जाणार आहे. पण, चेपॉकवरील आय, जे व के या तीन रिकाम्या स्टॅण्ड्सबाबत अद्याप निर्णय न झाल्याने बीसीसीआयने हा सामना ऐनवेळी हैदराबादला बहाल केला जाऊ शकतो, असा गर्भित इशारा यावेळी दिला. चेन्नईत ज्या-ज्यावेळी सामने होतात, त्या-त्यावेळी या तिन्ही स्टॅण्ड्समध्ये एकही प्रेक्षक असत नाही. स्थानिक महानगरपालिकेने सक्षमतेचा दाखला न दिल्याने 2012 पासून या तिन्ही स्टॅण्ड्समध्ये एकही प्रेक्षक असत नाही. फक्त डिसेंबर 2012 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील वनडे लढतीदरम्यानच या तिन्ही स्टॅण्ड्समध्ये प्रेक्षक दिसून आले. राज्य सरकार व तामिळनाडू क्रिकेट संघटनेतील वादाचा फटका यात बसत आहे.

तिन्ही स्टॅण्ड्समध्ये एकूण 12 हजार चाहत्यांसाठी आसनव्यवस्था आहे. मात्र, सामना सुरु असताना प्रक्षेपणादरम्यान रिकामे स्टॅण्ड्स दिसणे साजेसे नाही. चेन्नई अंतिम फेरीला आली तर त्यांना घरच्या चाहत्यांचे पाठबळ लाभावे, ही आमची अपेक्षा आहे. त्यामुळे, हा वाद मिटवण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱयाने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. सध्या आम्ही त्यांना एका आठवडय़ाची मुदत दिली असून ते आवश्यक दाखला देऊ शकले नाहीत तर आम्ही ही फायनल हैदराबादला खेळवू, असा इशारा त्यांनी येथे दिला. सनरायजर्स 2018 मधील उपजेते असल्याने हैदराबादची पर्यायी निवड केली आहे, असेही ते म्हणाले.

महिलांच्या आयपीएलमध्ये तीन संघ

यंदा महिलांच्या मिनी आयपीएलमध्ये तीन संघ असतील व त्यांच्यात चार सामने खेळवले जातील, असा निर्णयही यावेळी प्रशासक समितीने घेतला. महिला गटातील सर्व सामने रात्री 8 वाजताच होतील. एक सामना विशाखापट्टणममध्ये तर उर्वरित सामने बेंगळुरात होण्याची शक्यता आहे, असे सूत्राने नमूद केले. खेळाडूंची संघटना स्थापन करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. शिवाय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया मागील 10 वर्षांच्या कालावधीसाठी बीसीसीआयला 2.09 कोटी रुपये देणार आहे, त्याविषयीही विचारविनिमय केला आहे. 20 एप्रिल रोजी पुन्हा एकदा सीओएची बैठक होणार आहे.