|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सावित्रीची ही लेक.. लाखात एक

सावित्रीची ही लेक.. लाखात एक 

मदन भोसले यांचे प्रतिपादन, स्नेहल धायगुडेचा बोरी येथे सत्कार

प्रतिनिधी/ खंडाळा

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पांग फेडण्याचे काम खंडाळा तालुक्यातील बोरी गावच्या स्नेहलने केले आहे. राजकारणात पदे येतात आणि जातात पण स्नेहलने प्रचंड कर्तबगारी दाखवत ज्या खडतर परिस्थितीतून जिल्हाधिकारी हे पद प्राप्त केले, त्याचे महत्व खूप मोठे आहे. म्हणूनच माळरानावर जन्मलेल्या, वाढलेल्या आणि आपल्या इवल्याशा हातांनी आभाळाला गवसणी घालणाऱया या लेकीचा अभिमान वाटतो, गर्व वाटतो. सावित्रीची ही लेक लाखात एक आहे, असे प्रतिपादन किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केले.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत स्नेहल धायगुडे देशात 108 तर राज्यात 7 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या यशाबद्दल बोरी, (ता. खंडाळा) येथील नानासाहेब धायगुडे यांच्या घरी जाऊन स्नेहलचा सत्कार मदनदादा भोसले यांनी केला. या सत्कारावेळी संपूर्ण बोरी गावच आनंदात न्हाऊन निघाल्याचे दिसून आले. यावेळी स्नेहलनेही या सत्काराबद्दल मदनदादांना धन्यवाद देत यशाचा प्रवास कथन केला. विविध रंगांच्या फुलांची 5 फुलरोपे, रामचंद्र गुहा यांचे ‘मेकर्स ऑफ इंडिया’ हे पुस्तक, शॉल, कंदी पेढे, श्रीफळ देऊन मदनदादा भोसले यांनी स्नेहलचा सत्कार केला. छानशा फुलांनी बहरलेली ती फुलरोपे पाहून खूष झालेली स्नेहल पुस्तकाच्या भेटीने भारावली. यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे, वाईचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, उद्योजक रोहित जगदाळे, बुवासाहेब खरात, सुधीर खरात, जयवंत कचरे, आनंदा काळे, राहुल गोंजारी, बी. बी. धायगुडे स्नेहलचे वडील नानासाहेब आणि आई वर्षा धायगुडे आदी उपस्थित होते.

स्नेहलने आदर्श घालून दिला

मदनदादा भोसले, म्हणाले, स्नेहल आता देशेसेवेसाठी सज्ज झाली असून ज्या परिश्रमाने तिने हे यश प्राप्त केले, ती सोपी आणि सहजसाध्य गोष्ट नाही. सनदी सेवेची कोणतीही पूर्वपरंपरा नसलेल्या कुटुंबातील, गावातील स्नेहल आहे हे तिच्या यशाचे वैशिष्टय आहे. तिच्या माता पित्यांचेही याबाबत कौतुक, अभिनंदन करावेच लागेल. स्नेहल आता वाडीवस्तीवरील, माळावरीलच काय पण शहरी भागातील तरुणांसाठीही आयडॉल ठरली आहे. हिम्मत, धमक आणि कष्टाची तयारी असेल तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी यश कसे प्राप्त करायचे याचा आदर्श स्नेहलने निर्माण केला आहे.