|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तेरेखोल नदीपात्रात मगरीची दहशत

तेरेखोल नदीपात्रात मगरीची दहशत 

प्रतिनिधी / बांदा:

तेरेखोल नदीपात्रात मगरींची दहशत अद्याप कायम असून वाफोली येथे गुरांच्या कळपावर दोनवेळा हल्ला करण्याचा मगरीने अयशस्वी प्रयत्न केला. यामध्ये दोन म्हशींची शेपटी तोडल्याने स्थानिक शेतकऱयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच याच ठिकाणी नदीपात्रात मगरीने तेथीलच रामदास आईर यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली होती.

तेरेखोल नदीपात्रात मगरींचा वाढता वावर हा त्रासदायक ठरत आहे. वाफोली येथे नदीपात्रात मगरींचे संख्या ही झपाटय़ाने वाढली आहे. या नदीपात्रात शेकडोंच्या संख्येने मगरींचा वावर असल्याने नदीपात्रात वावरणे स्थानिकांना धोकादायक ठरत आहे. पंधरा दिवसांपूर्वीच शेतकरी रामदास आईर हे नदीत गुरांना आंघोळ घालत असताना त्यांच्यावर मगरीने हल्ला केला होता. यामध्ये त्यांच्या उजव्या हाताचा चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

गेल्या दोन दिवसात नदीपात्रात पाणी पिताना गुरांच्या कळपावर मगरीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन म्हशींच्या शेपटीचा मगरीने लचका तोडला. मात्र, सुदैवाने मगरीच्या हल्ल्यात म्हशी बचावल्यात. मगरीच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. वनखात्याने तातडीने या मगरीचा बंदोबस्त करावा, अन्यथा त्यांची नदीपात्रातील वाढ रोखावी, अशी मागणी होत आहे.