|Sunday, January 26, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » इस्रायलच्या निवडणुकीत ‘चौकीदार’च केंद्रस्थानी

इस्रायलच्या निवडणुकीत ‘चौकीदार’च केंद्रस्थानी 

भारतासारखा झाला प्रचार : नेतान्याहूंना ‘मिस्टर सिक्युरिटी’ची उपमा

वृत्तसंस्था/ जेरूसलेम

 इस्रायलमध्ये मंगळवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीवर भारतीय लोकसभा निवडणुकीचा प्रभाव दिसून येतोय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू हे नरेंद्र मोदींप्रमाणेच स्वतःला ‘चौकीदार’ ठरवत आहेत. दोन्ही देशांच्या निवडणुकांमध्ये दहशतवादाचा मुद्दाच केंद्रस्थानी राहिला अहे. भारताचा मित्रदेश असलेल्या इस्रायलमध्येही निवडणूक आपल्या देशाच्या पद्धतीनुसारच चालल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

भारतात नरेंद्र मोदी हा घटक निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच इस्रायलमध्ये अशीच प्रतिमा असलेल्या बेंजामीन नेतान्याहू यांचे भवितव्य पणाला लागले आहे. भारतात मोदी स्वतःला चौकीदार संबोधित आहेत. तर इस्रायलमध्ये नेतान्याहू स्वतःला ‘मिस्टर सिक्युरिटी’ ठरवत आहेत. मोदींप्रमाणेच नेतान्याहू यांच्यासमोर यंदा तीव्र आव्हान असले तरीही दोघांनाही पुन्हा सरकार स्थापन करण्याचा विश्वास आहे.

मुख्य लढत

इस्रायलची जनता अनेक वर्षांनी अत्यंत चुरशीच्या निवडणुकीसाठी मतदान करत आहे. पंतप्रधान आणि उजव्या विचारसरणीच्या लिकूड पक्षाचे नेते बेंजामीन नेतान्याहू पाचव्यांदा पंतप्रधान होऊ इच्छितात. पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांना निवृत्त जनरल बेनी गँट्ज यांच्याकडून चुरशीचे आव्हान मिळत आहे. ब्ल्यू अँड व्हाइट आघाडीचे प्रमुख गँट्ज हे नेतान्याहू यांना सुरक्षेच्या मुद्यावर आव्हान देत असून स्वच्छ राजकारणाचे आश्वासन देत आहेत.

इस्रायलची संसद

इस्रायलच्या संसदेत एकूण 120 जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला किमान 3.25 टक्के मते मिळणे आवश्यक आहे. निवडणुकीनंतर सरार स्थापन करण्यास सक्षम असणाऱया पक्षाला राष्ट्रपती पाचारण करतात. ही सर्व प्रक्रिया 28 दिवसांमध्ये पूर्ण केली जाते. इस्रायलच्या इतिहासात कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळू शकलेले नाही.

इतिहास रचण्याच्या मार्गावर

नेतान्याहू यंदा विजयी होऊन पंतप्रधान झाल्यास इस्रायलच्या इतिहासात सर्वाधिक काळ हे पद भूषविणारे व्यक्ती ठरणार आहेत. इस्रायलचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱया डेव्हिड बेन यांना ते मागे टाकू शकतात. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी पुन्हा सरकार स्थापन केल्यास ते सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषविणारे पहिले बिगरकाँग्रेसी नेते ठरतील.

दोन्ही देशांचे मुद्दे एकसारखे

दोन्ही देशांमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार वक्तव्यबाजी सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये दहशतवादविरोधी कठोर कारवाई हाच मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. मोदींच्या प्रत्येक सभेतील भाषणात पाकिस्तानचा मुद्दा सामील असतो, त्याचप्रमाणे नेतान्याहू पॅलेस्टाईनचा उल्लेख करतात. मोदी स्वतःच्या भाषणांमध्ये ‘मोदी किंवा अराजकता’ यापैकी एकाची निवड करण्याचे आवाहन करतात. तर इस्रायलचे पंतप्रधान स्वतःला ‘मिस्टर सिक्युरिटी’ संबोधितात, आपल्या नेतृत्वाखाली इस्रायल ‘सुरक्षित’ असल्याचा दावा ते करतात. दहशतवादा प्रमाणेच मुस्लीम लोकसंख्येबद्दल दोन्ही नेत्यांच्या भूमिका काही प्रमाणात जुळणाऱया आहेत.

Related posts: