|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » भारतीय क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी अनेक देश इच्छुक

भारतीय क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी अनेक देश इच्छुक 

संरक्षण मंत्र्यांनी दिली माहिती : संरक्षणक्षेत्रातील निर्यातदार होण्याची भारताकडे क्षमता, अनेक देशांनी मागितली मदत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताकडे संरक्षण क्षेत्रातील निर्यातदार होण्याची क्षमता आहे. अनेक देश भारताशी संबंध प्रस्थापित करून संरक्षण उत्पादनांच्या खरेदीकरता स्वारस्य दर्शवत आहेत. भारताने निर्माण केलेली क्षेपणास्त्रs स्वतःच्या ताफ्यात असावीत अशी इच्छा अनेक देश बाळगून असल्याचा दावा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. संरक्षण प्रकरणी स्वतःच्या सामर्थ्यात वाढ आणि देशांतर्गत संरक्षण उत्पादन निर्मितीवर भारत वेगाने काम करत आहे.

सीतारामन यांचे हे विधान अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातेय. भारत हा पारंपरिकदृष्टय़ा शस्त्रास्त्रांचा मोठा आयातदार राहिला आहे. सद्यकाळातही सैन्याला सुमारे 50 टक्के संरक्षण खरेदीसाठी विदेशी प्रशासन तसेच कंपन्यांवर निर्भर रहावे लागते.

युद्धनौकांची विदेशात चर्चा

आमच्या एकीकृत क्षेपणास्त्र कार्यक्रमाची जगभरात चर्चा होतेय. स्वदेशी उत्पादकांसमोर भारतीय सैन्याशिवाय आणखी एक बाजारपेठ उपलब्ध आहे. युद्धनौका आणि नौका निर्माण करण्याच्या भारताच्या क्षमतेची जगाला कल्पना आहे. याच कारणामुळे अनेक देश आमच्याकडून संरक्षण उत्पादनांच्या निर्मितीत सहाय्य मागत असल्याचे विधान संरक्षण मंत्र्यांनी विवेकानंद इंटरनॅशनल फौंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना केले.

दीर्घकालीन योजना आवश्यक

भारताला निर्यातदार होण्यासाठी एका दीर्घकालीन योजनेची गरज आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिकल लिमिटेडला (एचएएल) दीर्घकाळापासून निर्यात वाढविण्याची सूचना करत आहे. कंपनीला वायुदलाकडून वेळेत देयक न मिळाल्याची तक्रार असू शकते, पण कंपनी निर्धारित वेळेत उत्पादनांचा पुरवठा करत नाही हेही तितकंच खरं आहे. एचएएलची उत्पादन क्षमता वाढवूनही वायुदलाची मागणी पूर्ण करण्यासाठी अद्याप मोठा वेळ लागू शकतो, असे संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे निर्बंध नाहीत

भारताने मागील वर्षी रशियासोबत एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याचा करार केला होता. या करारावर नाराजी व्यक्त करत अमेरिकेने निर्बंधांचा इशारा दिला होता. अमेरिका भारताची स्थिती चांगल्याप्रकारे जाणत असल्याने निर्बंध लादले जाणार नसल्याचा विश्वास आहे. पाकिस्तान आणि चीनला लागून सीमा असल्याने चांगले संबंध कायम ठेवण्यासाठी रशियासोबतही संरक्षण करार करणे भारताला गरजेचे ठरले आहे. एस-400 यंत्रणेच्या खरेदीसाठी निर्बंधविषयक कायदा लागू होण्यापूर्वीच चर्चा सुरू झाली होती, असे सीतारामन यांनी म्हटले आहे.

घातक क्षेपणास्त्रs

अग्नि-5 क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीसह भारत 5000 किलोमीटर अंतरापर्यंत मारकक्षमता असणाऱया निवडक देशांच्या गटात सामील झाला आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असून स्वदेशनिर्मित दीर्घ पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचबरोबर भारत आता अंधारात क्षेपणास्त्राद्वारे लक्ष्य भेदण्यासही सक्षम झाला आहे. 21 फेब्रुवारी रोजी देशात निर्मित आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची ओडिशातील केंद्रावरून यशस्वी चाचणी करण्यात आली होती.

Related posts: