|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गुहागरातील बिल्डर्सवर कोटीचा फसवणुकीचा गुन्हा

गुहागरातील बिल्डर्सवर कोटीचा फसवणुकीचा गुन्हा 

प्रतिनिधी/ गुहागर

येथील पवार बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सच्या तब्बल 8जणांविरोधात शहरातील पोलीस स्थानकात 1 कोटी 1 लाख 40 हजार 369 रूपयांना फसवल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील शिवाजीचौक परिसरातील कीर्तनवाडी रस्त्यालगत सदनिका बांधून देतो म्हणून रक्कम स्वीकारून या रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.

  या प्रकरणी पोलिसांनी पवार बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सचे पार्टनर दीपक काशिराम पवार, संतोष बाळकृष्ण पवार, बाळकृष्ण रामचंद्र पवार, शिवानी संतोष पवार, स्नेहा संतोष पवार (सर्व पवारसाखरी, ता. गुहागर), चकोर रामचंद्र राऊळ (विरार, पालघर), संघमित्रा जितेंद्र पवार (काळाचौकी मुंबई), दिनेश विनायक पवार (पवारसाखरी-गुहागर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलिसांत दादर-मुंबई येथील पल्लवी सुरेश हेदवकर यांनी पवार बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सच्या आठजणांविरोधात दाखल केलेल्या फिर्यादीत, पवार बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सने आपल्याला सदनिका बांधून देतो म्हणून आमच्याकडून 1 कोटी 1 लाख 40 हजार 369 रूपये घेतले. या सदनिका मुदतीमध्ये बांधून देणार होते. मात्र साठेकरार पत्राप्रमाणे व बुकिंगप्रमाणे सदनिका न देता आमचा विश्वासघात केला. सदनिका नाही म्हणून आमच्याकडून घेतलेली रक्कम ते परत करतील, या आशेवर आपण होतो. मात्र मार्च 2016 ते 14 एप्रिल 2019 या मुदतीत त्यांनी सदनिका किंवा पैसेही दिले नाहीत. या पैशाचा त्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला असून यातून आमची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

त्यानुसार पोलिसांनी पवार बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सचे पार्टनर दीपक पवार, संतोष पवार, बाळकृष्ण पवार, शिवानी पवार, स्नेहा पवार, चकोर राऊळ, संघमित्रा पवार, दिनेश पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार करत आहेत. दरम्यान, गुहागर व शृंगारतळी परिसरात अनेक बिल्डर्सनी इमारती उभारल्या आहेत. काही इमारतींच्या कायदेशीर बाबी पूर्ण नसूनही त्यांचे खरेदी खत केले जात आहे. मात्र शहरातील दाखल झालेल्या या गुन्हय़ामुळे अशा व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Related posts: