|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ग्रामसेवकांच्या कार्यक्षमतेवर सदस्यांची तीव्र नाराजी

ग्रामसेवकांच्या कार्यक्षमतेवर सदस्यांची तीव्र नाराजी 

लोकप्रतिनिधींना ग्रामसेवक जुमानत नसल्याचा आरोप

वार्ताहर / देवगड:

लोकप्रतिनिधींनी मागणी केलेल्या प्रश्नावर ग्रामसेवक खोटी माहिती देतात. ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रातील अनेक कामे प्रलंबित आहेत. गावागावात विकासकामे ठप्प असून याला ग्रामसेवक कारणीभूत आहे. निवडणूक काळात लोकांपर्यंत जाणेही अवघड बनले आहे. ग्रामसेवकांकडे शिस्तीचा भाग राहिला नाही, अशा तीव्र शब्दात सदस्यांनी पं. . च्या मासिक सभेत नाराजी व्यक्त केली. शिक्षकांबाबतही नाराजीचा सूर उमटला.

देवगड पं. ची मासिक सर्वसाधारण सभा गुरुवारी सभापती जयश्री आडिवरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपसभापती संजय देवरुखकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी अनिल चव्हाण उपस्थित होते. गढीताम्हाणे व पेंढरी येथील ग्रा. पं. च्या महिला सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे का, असा प्रश्न सदस्य लक्ष्मण पाळेकर यांनी मागील सभेत विचारला होता. या प्रश्नावर गढीताम्हाणेच्या एका सदस्याचा राजीनामा आहे. तर पेंढरी ग्रामसेवकांनी एकाही सदस्याचा राजीनामा प्राप्त नाही, असे लेखी उत्तर दिले. सदस्य महिला बचतगटाच्या सीआरपी पदावर काम करीत आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तरीही ग्रामसेवक खोटी उत्तरे देत असल्याचे सदस्य पाळेकर यांनी सांगितले. सदस्य सदाशिव ओगले म्हणाले, ग्रामसेवकांच्या कार्यक्षमतेची पाहणी करावी लागेल. आढावा सभेत नेमके का केले जाते, याची माहिती त्यांनी मागितली. आढावा सभेत ग्रामसेवक योग्य माहिती प्रशासनाला पुरवित नसल्याबाबत ओगले यांनी नाराजी व्यक्त केली.

ग्रामसेवकांना वेळेचे बंधन हवे

पाळेकर म्हणाले, ग्रामसेवक आपल्या कार्यालयात वेळेत उपस्थित नसतात. ते जेथे राहतात, तेथील बाजारपेठांमध्ये ते फिरताना दिसतात. ही बाब गंभीर आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाला ग्रामसेवक जुमानत नाहीत. ग्रामसेवकांना वेळेचे बंधन पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, असे सांगितले. प्रत्येक ग्रा. पं. मध्ये ग्रामसेवकांच्या कार्यकाळाची वेळ व तेथील आठवडावाराची नोंद असलेले फलक लावण्यात येतील, असे गटविकास अधिकारी परब यांनी सांगितले.

दरम्यान, प्राथमिक शिक्षकही वेळेपूर्वी शाळेत हजर असावेत, असा नियम असताना तेही उशिरा येतात. तसेच शाळा सुटण्याच्या वेळेपूर्वी निघून जातात, असे प्रकार होत असल्याचे पाळेकर यांनी सांगितले.

चांदोशीच्या त्या शाळेची सखोल चौकशी करा!

चांदोशीतील मदरसा शाळेला धर्मादाय आयुक्तसिंधुदुर्ग यांनी प्रमाणपत्र दिले आहे. ‘नुरानी एज्युकेशन ट्रस्ट’च्या नावाने या शाळेची नोंदणी असल्याची माहिती विस्तार अधिकारी पी. एस. थोरात यांनी दिली. यावर ओगले यांनी आक्षेप घेत धर्मादाय आयुक्तांना शाळा सुरू करण्याचे अधिकार नसून ट्रस्टला मान्यता देण्याचे अधिकार आहेत. या ट्रस्टच्या नियमावलीत अशा प्रकारची तरतूद आहे का स्थानिक विद्यार्थ्यांना शिक्षण न देता या प्रशालेत बिहारच्या मुलांना कोणते शिक्षण ट्रस्ट देते, याचा खुलासा व्हावा.

ट्रस्टला शाळा सुरू करण्याचा अधिकार आहे का? ऍकॅडॅमिक विषय तेथे शिकविले जात नसतील, तर कोणते शिक्षण दिले जाते, याची सखोल चौकशी करून पुढील सभेत या विषयाला पूर्णविराम द्यावा, असे ओगले यांनी अधिकारी वर्गाला ठणकावले.

पेपरफुटीबाबत काळजी घ्या!

तालुक्यामध्ये नववीच्या वर्गाच्या पेपर कोणत्या कस्टडीत ठेवण्यात येतात, असा प्रश्न ओगले यांनी केला. यावेळी थोरात यांनी पेपर हे त्यात्या शाळेतील मुख्याध्यापकांकडे असतात. वेळापत्रकानुसार ते पेपर त्यादिवशी शाळेत खोलण्यात येतात, असे उत्तर दिले. ओगले यांनी पेपरची गोपनियता राखण्यासाठी ही प्रक्रिया योग्य आहे असे वाटते. यातून पेपरफुटीचे प्रकार घडू शकत नाही का, असा प्रश्न केला. याबाबत योग्य काळजी घ्या. पेपर सुरू होण्याआधीच मुलांना आदल्या दिवशी पेपर समजून आला असल्याची माहिती आमच्याकडे असल्याचे ओगले यांनी सांगितले. याबाबतची माहिती द्यावी, असे थोरात यांनी सांगितले. आपण सखोल चौकशी करा. त्यानंतर सर्व काही उघड होईल, असे ओगले यांनी सांगितले.

पाणी टंचाईची कामे रखडली

पाणी टंचाई आराखडय़ातील एकाही कामाला मंजुरी प्राप्त नाही. आमदारांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईची कामे झाली. तरीही त्याला मंजुरी का नाही, असा प्रश्न पाळेकर यांनी उपस्थित केला. तहसीलदारांच्या ‘ब’ पत्रकावर सहय़ा होणे राहिले आहे, अशी माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिली. तहसीलदार सहय़ा करीत नसतील, तर तसे जिल्हाधिकारी यांना कळविण्यात यावे. अन्यथा, आम्ही तहसीलदारांची भेट घेऊ, असेही पाळेकर यांनी सांगितले. गावातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ग्रामसेवक योग्य काम करीत नाहीत. त्यामुळे गावात नाराजी आहे. पाणी टंचाईची कामे रखडली आहेत. आता निवडणूक नको, प्रचार नको अशी अवस्था आमची लोकप्रतिनिधींची झाली असल्याची नाराजी सुनील पारकर यांनी व्यक्त केली.

Related posts: