|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » यंदाचा मान्सून सर्वसाधारण

यंदाचा मान्सून सर्वसाधारण 

पुणे / प्रतिनिधी

यंदाचा मान्सून सर्वसाधारण राहणार असल्याचा दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला. सरासरीच्या 96 टक्के पावसाचा यावर्षी अंदाज असून, सध्या प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती कमकुवत आहे. मान्सूनच्या हंगामात ही स्थिती कायम राहील राहणार असून, मान्सूनच्या शेवटच्या काळात याचा प्रभाव आणखी कमी राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर भारतीय हवामान विभागाकडून हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने यंदाचा पहिला दीर्घकालीन अंदाज सोमवारी जाहीर केला. स्टेटऑफ द आर्ट स्टॅटीस्टीक एन्सेमेबल फॉरकास्टींग सिस्टीम (एसईएफएस) आणि क्लायमेट फॉरकास्टींग सिस्टीम (सीएफएस) मॉडेलच्या आधारे हे भाकित वर्तविण्यात आले. यासाठी डिसेंबर व जानेवारी महिन्यातील उत्तर अटलांटिक व उत्तर प्रशांत महासागरातील समुद्रसपाटीचे तापमान, प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचे प्रवाह आदींचा अभ्यास करून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार सरासरीच्या 96 टक्के अंदाज असून, यामध्ये 5 टक्के कमी-जास्तीची शक्यता आहे. तसेच यात सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता 39 टक्के म्हणजे सर्वाधिक आहे, तर अतिरिक्त पावसाची सर्वांत कमी म्हणजे 2 टक्के व दुष्काळाची शक्यता 17 टक्के वर्तविण्यात आली आहे. एकूणच देशाच्या सर्वच भागात पाऊस चांगला राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

शेतीसाठी अनुकूल

यंदाच्या समाधानकारक पावसाचा फायदा खरीप हंगामाला होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. भारतातील बहुतांश शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. साधारण साडेचार महिने पडणारा पाऊस शेतीसाठी लागणाऱया 70 टक्के पाण्याची गरज पूर्ण करतो.

जूनमध्ये दुसरा अंदाज

हवामान विभाग दरवर्षी दोन टप्प्यात मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज जाहीर करतो. एप्रिलचा अंदाज जाहीर केल्यानंतर जूनमध्ये विभाग आपला दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर करेल. दोन महिन्यांच्या कालावधीचा अभ्यास करून पुन्हा जूनमध्ये हा अंदाज जाहीर होईल.

आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

दरम्यान, येत्या दोन दिवसांत विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मेघगर्जनेसह व वादळी वाऱयासह गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भाच्या काही भागांत उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे सोमवारी 44.8 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.

अल-निनोच्या प्रभावावर लक्ष…

सध्याच्या अंदाजानुसार मान्सूनवर परिणाम करणारा अल-निनो यंदा तितकासा सक्रीय नसेल. परंतु, उन्हाळय़ानंतर ही परिस्थिती बदलू शकते. या काळात अल-निनो अधिक सक्रीय झाला तर त्याचा परिणाम जून व जुलै महिन्यातील पावसावर होईल. तसे झाल्यास सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची 32 टक्के शक्मयता आहे. त्यामुळे खरीप पिकांना मोठा फटका बसू शकतो. यापूर्वी 2014 आणि 2015 मध्ये अल-निनोमुळे कमी पाऊस पडला होता. तर 2016 मध्ये देशात समाधानकारक पाऊस झाला होता.

Related posts: