|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पाणीटंचाई प्रस्तावांकडे जिल्हाधिकाऱयांचे दुर्लक्ष

पाणीटंचाई प्रस्तावांकडे जिल्हाधिकाऱयांचे दुर्लक्ष 

208 प्रस्ताव महिनाभर रखडले : शिक्षक बदल्यांवरून जि. प. अध्यक्ष-सभापतींमध्ये मतभेद

सहा कोटीचा पाणी आराखडा 513 वाडय़ांचा समावेश मार्चच्या सुरुवातीलाच प्रस्ताव दुर्लक्षामुळे सदस्य तीव्र नाराज

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

 पाणीटंचाई आराखडय़ांतर्गत 208 कामांचे प्रस्ताव पाठवून महिना झाला, तरी एकाही कामाला जिल्हाधिकाऱयांनी मंजुरी दिली नसल्याची माहिती मंगळवारी जि. प. च्या सर्वसाधारण सभेत उघड झाली. यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर आंतर जिल्हा शिक्षक बदल्यांवरून जि. प. अध्यक्ष संजना सावंत व शिक्षण सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्यामध्ये मतभेद असल्याचेही या सभेत उघड झाले.

जि. प. सर्वसाधारण सभा अध्यक्षा संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये झाली. यावेळी उपाध्यक्ष रणजित देसाई, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी हरिष जगताप, वित्त व बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जि. प. सदस्य प्रदीप नारकर, अमरसेन सावंत, विष्णूदास कुबल, उत्तम पांढरे, अन्य सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सहा कोटीचा पाणीटंचाई आराखडा

 सिंधुदुर्ग जिल्हय़ात मार्च ते जून महिन्याच्या कालावधीत उद्भवणाऱया पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी सहा कोटी रुपये खर्चाचा संभाव्य पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडय़ांतर्गत 513 वाडय़ांचा समावेश आहे. पाणीटंचाईची तीव्रता जाणवणाऱया 381 वाडय़ांचे सर्वेक्षण पूर्ण करून 208 प्रस्ताव मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱयांकडे पाठविण्यात आले. मात्र महिना उलटला, तरी एकाही कामाला मंजुरी दिली गेली नसल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पाताडे यांनी दिली.

पाणीटंचाई प्रस्तावांकडे दुर्लक्ष गंभीर

 पाणीटंचाईचे 208 प्रस्ताव पाठवून महिना झाला, तरी मंजुरी मिळत नसेल, तर ही अतिशय गंभीर बाब असल्याचे सांगत सदस्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. सध्या कडक उन्हाळा असून पाणीटंचाईमुळे पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने या कामांना मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी आपण या विषयात जातीने लक्ष घालते, असे सांगितले.

अध्यक्ष-सभापतींमधील मतभेद उघड

 आंतर जिल्हा शिक्षक बदलीसाठी 123 शिक्षक पात्र आहेत. मात्र सर्वसाधारण सभेत ठरल्याप्रमाणे शिक्षक भरती झाल्याशिवाय आंतर जिल्हा बदली शिक्षकांना सोडले नसल्याचे शिक्षण सभापती डॉ. दळवी यांनी सभागृहात स्पष्ट केले. यावर अध्यक्षा सौ. सावंत म्हणाल्या, मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत आंतर जिल्हा शिक्षक बदली पात्र शिक्षकांना सोडायचे नाही, असा ठराव झाला आहे. 2 मे रोजी शैक्षणिक वर्ष संपत आहे. त्यानंतर त्यांना सोडायला हरकत नाही. त्याला इतर पदाधिकाऱयांनीही सहमती दर्शवली. मात्र शिक्षण सभापती डॉ. दळवी यांनी आपल्या मतावर ठाम राहत शिक्षक भरती झाल्याशिवाय आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना सोडू नये, असे पुन्हा स्पष्ट केले.

शिक्षण सभापती भूमिकेवर ठाम

शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी याबाबत सभागृहात माहिती देताना सांगितले की, डिसेंबर 2019 मध्ये सेवानिवृत्त होणारे शिक्षक गृहित धरून शिक्षकांची रिक्त पदे निश्चित करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे एकूण 287 शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये आंतरजिल्हा बदलीने जाणाऱया शिक्षकांच्या रिक्त जागांचाही समावेश करण्यात आला आहे. शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असल्याचेही शिक्षणाधिकाऱयांनी स्पष्ट केले. मात्र शिक्षक भरती झाल्याशिवाय आंतरजिल्हा शिक्षकांना सोडू नये, या भूमिकेवर डॉ. दळवी कायम राहिल्या.

फ्रीजमधील थंड पाणी प्या!

जि. प. सभा सुरू असतानाच जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी ‘उन्हाळा सुरू आहे. फ्रीजमधील थंड पाणी प्या’ असे सांगत स्वाभिमान पक्षाचे उमेदवार नीलेश राणे यांचे फ्रीज हे चिन्ह असल्याचे उमेदवाराचे नाव न घेता सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना सदस्य अमरसेन सावंत यांनी हजरजबाबी उत्तर देत, ‘तो फ्रीज उघडय़ा दरवाजाचा आहे. त्यामुळे पाणी थंड राहणार नाही’, असे सांगितले. त्यावर सभागृहात हंशा पिकला.