|Monday, March 30, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘आरजीपीपीएल’ची मुख्य पाईपलाईन फुटली!

‘आरजीपीपीएल’ची मुख्य पाईपलाईन फुटली! 

चिपळूण-कोंढे येथील प्रकार, शेतीचे नुकसान, घरे वाचली

प्रतिनिधी/चिपळूण

शिरळ येथून वाशिष्ठी नदीचे पाणी गुहागर येथील आरजीपीपीएल प्रकल्पाला  पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन कोंढे मराठी शाळा परिसरात फुटली आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले असून सुदैवाने घरे वाचली आहेत. या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्याने दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे सध्या कंपनीला टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे..

   सुमारे 4 फुटी व्यासाच्या मुख्य पाईपलाईनमधून शिरळ येथील पंपहाऊसपासून गुहागर येथील रत्नागिरी गॅस व विद्युत प्रकल्पाला पाणी पुरवले जाते. एन्रॉन कंपनीच्या सुरुवातीपासूनच ही पाईपलाईन असून दिवसभर सातत्याने लाखो लिटर पाणी या पाईपलाईनमधून वाहत असते. त्यामुळे ही पाईपलाईन आता जीर्ण झाली असून ती सातत्याने ठिकठिकाणी फुटत आहे. त्याच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च झाला असून नवीन पाईपलाईन टाकण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

   दोन दिवसांपूर्वी पाणीपुरवठा सुरु असताना अचानक पाईपलाईन फुटली व  पाण्याच्या दाबामुळे या परिसरात पाण्याचा मोठा फवारा उडाला. त्यामुळे दगड-गोटे वाहून शेतात गेल्याने अनेक शेतकऱयांचे नुकसान झाले. सुदैवाने ही घटना तत्काळ शिरळ पंपहाऊसला कळवण्यात आल्यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे लगतच्या घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका टळला. पाईपलाईनची दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या ठेकेदाराला ग्रामस्थ हरकत घेत आहेत. जोपर्यंत नवीन पाईपलाईन टाकत नाहीत तोपर्यंत येथे काम करु देणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे सध्या कंपनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून दिवसाला सहा टँकरच्या माध्यमातून पाण्याची वाहतूक केली जात आहे.

 

 

Related posts: