|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » leadingnews » जवानांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरणारा आमदार मोदींच्या व्यासपीठावर कसा?

जवानांबद्दल अश्लाघ्य भाषा वापरणारा आमदार मोदींच्या व्यासपीठावर कसा? 

 

 ऑनलाईन टीम / सातारा :  नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून बेसावध राहू नका, असे सांगत राज ठाकरे यांनी मोदी, शहा यांची तुलना मोघल आणि ब्रिटीशांशी केली. मोघल, ब्रिटीश किमान आक्रमण करून तरी आले. पण, हे खोटे बोलून आले, अशा शब्दात राज ठाकरे यांनी मोदी, शहा यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला. जवानांवर अश्लाघ्य टीका करणारे अजूनही भाजपात कसे, असा सवालही त्यांनी या वेळी केला.

सातारा येथे सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, ब्रिटीश, मोघलांविरुद्ध पहिला आवाज हा महाराष्ट्रातून उठला होता. मग मोदी आणि शहाविरुद्ध कसा उठणार नाही. तोही महाराष्ट्रातून उठला. ही प्रेरणा शिवाजी या तीन अक्षरातून आली आहे. माझा उमेदवार नसला तरी मी बोलतच राहणार. सत्ताधारांच्या चुका मांडणारच. देशावर होणाऱया अन्यायाविरुद्ध बोलायचे नाही असे होत नाही. थापा मारण्यांवर चाप बसविण्यासाठी मी व्हिडिओ क्लिप दाखवत आहे. 5 वर्षानंतर अशाच व्हिडिओ क्लिप दिसतील. पाच वर्षात जे झाले नाही, ते आता मी चव्हाटय़ावर मांडत राहणार आहे. जीएसटीमुळे सगळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली. नोटबंदीमुळे नेमके काय साध्य झाले हेच कळत नाही. नोटबंदीत भाजपचे 7 स्टार कार्यालय उभे राहते. भाजपकडे एवढा वारेमाप पैसा आला कुठून, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

निवडणुकीसाठी पुलवामा हल्ला घडवला का? 40 जवान मारले गेले. एवढे आरडीएक्स कुठून आले? याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे. आधीच्या सरकारला तुम्ही प्रश्न विचारत होतात. मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत, ज्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. पत्रकारांना उत्तर नाही म्हणजे जनतेला उत्तर नाही, असे टोला त्यांनी लगावला.

भाजपा आमदाराने जवानांवर अत्यंत खालच्या भाषेत मुक्ताफळे उधळली होती. मात्र, हा आमदार अजूनही पक्षात आहे. अकलूजमध्ये झालेल्या मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर हा बघा आमदार, असे सांगत त्यांनी परिचारक यांचे छायाचित्रही दाखविले.