|Monday, June 24, 2019
You are here: Home » क्रिडा » बेंगळूर- कोलकाता लढत आज ईडन गार्डन्सवर

बेंगळूर- कोलकाता लढत आज ईडन गार्डन्सवर 

वृत्तसंस्था /कोलकाता :

12 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा संघ विजयासाठी झगडत आहे. या संघाने आतापर्यंत आठपैकी सात सामने गमविले असून त्यांचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आल्याचे जाणवते. गुणतक्त्यात बेंगळूरचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. शुक्रवारी येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि यजमान कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याला रात्री 8.00 वाजता प्रारंभ होणार आहे.

या स्पर्धेत प्रारंभी दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखत गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले होते. त्यानंतर कोलकाता संघाला सलग तीन सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने ते आता गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर  फेकले गेले आहेत. कोलकाता संघातील आक्रमक फलंदाज आंद्रे रस्सेल जखमी असल्याने तो शुक्रवारच्या सामन्यात खेळण्याची शक्यता दुराविली आहे. सराव करताना त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. तसेच चेन्नई विरूद्धच्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात रस्सेल तंदुरूस्त नसल्याने तो लवकर बाद झाला होता. रस्सेलच्या गैरहजेरीचा फायदा उठविण्याची संधी बेंगळूर संघाला शुक्रवारच्या सामन्यात मिळाली आहे. पहिल्या टप्प्यातील बेंगळूर विरूद्धच्या सामन्यात रस्सेलने 13 चेंडूत 7 षटकारांसह नाबाद 48 धावा जमवित कोलकाता संघाला विजय मिळवून दिला होता.

या स्पर्धेच्या प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला उर्वरित सहापैकी किमान चार सामने जिंकावे लागतील. तसेच या सहापैकी तीन सामने कोलकातामध्ये होणार आहेत. बेंगळूर संघातील कर्णधार कोहली आणि डिव्हिलीयर्स यांना फलंदाजीचा सूर उशिरा मिळाला आहे. त्यामुळे बेंगळूर संघाला त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसून येते. शुक्रवारच्या सामन्यात बेंगळूर संघात कोल्टर नाईल याच्याऐवजी दक्षिण आफ्रिकेचा स्टीन याला संधी मिळणार आहे. कोलकाता संघातील वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज गडी बाद करण्यासाठी झगडत आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱया आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी कोलकाता संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकला दुसरा यष्टीरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजीला तसेच गोलंदाजीला ही अनुकूल असल्याने नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरू शकेल,.